अपंग अादिवासी विद्यार्थीनी सविताची प्रेरणादायी कहाणी

अमित गवळे
गुरुवार, 1 मार्च 2018

पाली (रायगड) : अापल्या अपंगावर मात करत अतिशय प्रामाणिकपणे, मेहनत अाणि जिद्दीने ती देतेय दहावीची परिक्षा. माणगाव तालुक्यातील साजे आदीवासीवाडी जवळ राहणारी सविता जाधव या अपंग होतकरु अादिवासी विद्यार्थीनीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी सगळ्यांनाच प्रेरणादायी अाहे. गुरुवारी (ता.१) पासुन दहावीच्या परिक्षा सुरु होत आहेत. त्या निमित्त या गरिब, अपंग व होतकरु विद्यार्थीनीच्या प्रवासाचा सकाळने घेतलेला अाढावा.

पाली (रायगड) : अापल्या अपंगावर मात करत अतिशय प्रामाणिकपणे, मेहनत अाणि जिद्दीने ती देतेय दहावीची परिक्षा. माणगाव तालुक्यातील साजे आदीवासीवाडी जवळ राहणारी सविता जाधव या अपंग होतकरु अादिवासी विद्यार्थीनीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी सगळ्यांनाच प्रेरणादायी अाहे. गुरुवारी (ता.१) पासुन दहावीच्या परिक्षा सुरु होत आहेत. त्या निमित्त या गरिब, अपंग व होतकरु विद्यार्थीनीच्या प्रवासाचा सकाळने घेतलेला अाढावा.

सविता जाधवचे दोन्ही पायाचे तळवे जन्मतःच वाकडे अाहेत. ते समोरासमोर नव्वद अंशात वळलेले अाहेत. घरची परिस्थिती बेताची, हातावर पोट असणारे कुटूंब. पोरीच्या भविष्याच्या चिंतेने सगळेच चिंतातूर. मग अाजोबा गणपत जाधव व अाजी सुंदर जाधव यांनी पोरीला शिकवून स्वतःच्या पायावर उभी करुन स्वावलंबी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. जिवाचे रान करुन येईल त्या अडचणींवर मात करुन सविताला दहावी पर्यंत म्हणजे अायुष्याच्या अातिशय महत्वाच्या टप्प्यावर अाणून ठेवले.

सविताने देखिल अापली मेहनत, चिकाटी, जिद्द अाणि परिश्रमाच्या बळावर इथपर्यंत मजल मारली. सकाळने अादीवासी वाडीवर तिच्या घरी जावून तिच्या समवेत व तीच्या अाज्जी सोबत गप्पा मारल्या. यामध्ये अनेक प्रेरणादायी गोष्टी समोर अाल्या.

विळे येथील हि. म. मेता माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारी सविता अापले अाज्जी व अाजोबा, अाई-वडील, एक अाठवीत शिकणारा लहान भाऊ अाणि मोठ्या बहिणीसह राहते. अाजोबा गणपत जाधव ग्रामपंचायत सदस्य अाहेत. ते परिसरात लग्न समारंभात व मिरवणूकांत ते सनई वादनाचे काम करतात. वडिल महादू जाधव ट्रॅक्टर चालक अाहेत.अाणि अाई सध्या कोलाड येथे उन्हाळी शेती करण्यासाठी गेली आहे. तिची अाज्जी सुंदर जाधव यांनी अापल्या कुडाच्या घरासमोर खुर्च्या टाकुन अाम्हाला बसण्यास देऊन धीरगंभीर गप्पा मारल्या. अाज्जी म्हणाल्या की सविता जन्मतः अपंग अाहे. तिच्या पायासाठी जाम फिरली पण काही झाले नाही. डाॅक्टरांना दाखवले थोडी मोठी झाल्यावर अाॅपरेशन करता येईल असे सांगितले. पोरीचे काय होणार याची चिंता होती मग 'जिवात जिव असे पर्यंत तिला शिकवायच' शिकवून तिला चांगली नोकरी मिळाली की अामची चिंता मिटेल असे त्या म्हणाल्या. 

लहानपणी तिला दुध मिळावे म्हणून कंबरभर पाण्यातून फिरले आहे. सविताला पाच वर्षाची होई पर्यंत चालता येत नव्हते. ती फक्त रांगायची लहान भावाला चालतांना पाहून तीने स्वतःहून चालण्याचा प्रयत्न केला. अाणि मग तेव्हापासून ती हळू हळू चालू लागली. सुरुवातीला चालतांना पाय फुटायचे रक्त यायचे मग ती पायात चप्पल अाडवी घालू लागली. चप्पल घातल्याशिवाय ती उभी किंवा चालू शकत नाही. चालतांना चप्पलची झिज लवकरत होते. त्यामूळे तीला अनेक वेळा चप्पल खरेदी कराव्या लागतात. उन्हाळ्यात व पावसाळ्यात पायांना भेगा जातात. प्राथमिक शाळेत शिकतांना जिल्हा परिषदेकडून तिच्या अाॅपरेशनसाठी अलिबागला नेणार होते. अाॅपरेशनची गॅरेंटी डाॅक्टरांनी दिली नव्हती. पण जर पाय पूर्ववत झाले नाही तर?, नंतर पोरीला चालताच अाले नाही तर? किंवा पोरीचे पायच कापायला लागले तर?… अाता थोडी चालतेय नंतर तर ती अपंगच होऊन बसेल अशी भिती अाज्जींना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी सविताला अाॅपरेशनला पाठविले नाही. परंतू सविता अाता स्वतःच्या प्रत्नांनी चालत अाहे.

सविता अपंग असुनही घरातील सर्व कामे करते. ती उत्तम जेवण करते. झाडून काढण्यापासून, बकरऱ्यांना चरायला नेणे, लेंड्या साफ करणे, शेण काढणे, पाणी भरणे, रानातून फाट्या अाणणे अाणि परसात कुटूंबियांसमवेत भाजीपाला लावणे अशी सर्व कामे करते. कुटूंबियांसमवेत तीच्या शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक अाणि विदयार्थ्यांसमवेत तीचे अापुलकीचे अाणि जिव्हाळ्याचे संबध आहेत. सर्वच जण तिला अभ्यासात अाणि इतर कामांत मदत करतात. ती शाळेत नियमित उपस्थित राहते.कधी एसटी किंवा दुसरी गाडी मिळाली नाही तर थेट चालत शाळेला निघते. अाजुबाजुच्या परिसरातील बहुतेक लोक तिला ओळखतात.त्यामुळे शाळेत चालत निघालेल्या सविताला कोणी ना कोणी अापल्या गाडिवर बसवुन शाळेत नेते. सविताला मराठी, गणित व विज्ञान हे विषय अावडतात. शारिरीक शिक्षणाच्या तासाला इतर मुले मैदानावर खेळत असता तेव्हा सविता वर्गात बसुन अभ्यास करते. मला खूप शिकून चांगली नोकरी करुन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. अाणि घरातल्या सर्व मंडळींना सुखात व अानंदात ठेवायचे आहे असे सविताने सकाळला सांगितले.

सविता अतिशय प्रामाणिक, मेहनती व होतकरु मुलगी अाहे. ती कधीच शाळेत अनुपस्थित नसते. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा ती अादर करते. शाळेतील सर्व विदयार्थ्यांसोबत ती सलोख्याने राहते व सर्वांना मदत करते. अापला अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर ती दहाविला नक्की उत्तीर्ण होईल याची खात्री वाटते, असे सविताचे विज्ञान शिक्षक प्रमोद बहादुरवाडीकर यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi news kokan news handicap student savita story