सतेज बाणेर संघ "शिवसेना प्रमुख चषक २०१८"चा मानकरी

kabaddi
kabaddi

पाली (रायगड) : पालीत "शिवसेना प्रमुख चषक २०१८" या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अतिशय जल्लोषात संपन्न झाल्या. या स्पर्धेचा मानकरी सतेज बाणेर पुणे संघ ठरला. तर शाहू सडौली कोल्हापूर संघ उपविजेता ठरला. सलग चार दिवस सुरु असलेल्या या राज्यस्तरी मॅटवरील कबड्डी स्पर्धा पाहण्यास जिल्ह्यासह राज्यभरातून खेळाडू व कबड्डी रसिकांचा उत्साह उदंड होता. 

या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर कबड्डीप्रेमी व कबड्डीपट्टुंच्या प्रतिसादामुळे आगामी वर्षात पालीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा भरविणार असल्याची घोषणा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी यावेळी केली. शिवसेना रायगड व राजयोगी मित्रमंडळ सुधागड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई तसेच रत्नागिरी कबड्डी असो. अध्यक्ष तथा शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख पुढाकाराने येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रिडांगणात २४ ते २७ फेब्रूवारीला मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे अायोजन करण्यात आले होते. 

अंतीम सामना सतेज बाणेर पुणे विरुध्द शाहू सडौली कोल्हापूर या दोन बलाढ्य व मातब्बर अशा संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत अटितटीचा व चुरशीच्या या सामन्यात सतेज बाणेर पुणे संघ ३४ तर शाहू सडौली कोल्हापूर संघाला २८ गुण मिळाले. अाणि सतेज बाणेर पुणे संघाने शिवसेना प्रमुख चषक २०१८ या चषकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेत्या ठरलेल्या सतेज बाणेर पुणे संघाला प्रथम क्रमांक १ लाख ११ हजार ११ रुपये व आकर्षक चषक देऊन आदेश बांदेकर, पद्मश्री पुरस्कार विजेता हॉकीपट्टू धनराज पिल्ले, आ. भरत गोगावले, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, सचिन भोसले, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. उपाध्यक्ष बाबुराव चांदोरे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबरोबरच स्पर्धेत द्वितीय क्रमांकांचा मानकरी ठरलेल्या शाहू सडौली कोल्हापूर संघाला ६६ हजार ६६६ रुपये, तृतीय क्रमांक इस्लामपूर व्यायामशाळा सांगली संघाला ३३ हजार ३३३ रुपये, चतुर्थ क्रमांक प्राप्त शिवशंकर ठाणे संघाला २२ हजार २२२ रुपये अाणि आकर्षक चषक देवून सन्मानीत करण्यात आले. 

तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अक्षय जाधव(सतेज बाणेर संघ पुणे) याला बजाज प्लॅटीना बाईक व आकर्षक चषक,उत्कृष्ट चढाई पट्टू ठरलेल्या शरद पवार (शाहू सडौली कोल्हापूर) या खेळाडुला एल.ई.डी.टिव्ही व आकर्षक चषक, तसेच सर्वोत्कृष्ट पक्कड पारितोषिकाचा मानकरी ठरलेल्या सिध्दार्थ देसाई(सतेज बाणेर) या खेळाडूला एल.ई.डी व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. प्रतिदिन सर्वोत्कृष्ट खेळाडूला ५५५५ रुपयाचे पारितोषिक अशी वैयक्तीक बक्षिसे देण्यात आली. यावेळी बोलताना प्रकाश देसाई म्हणाले की पालीतील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा युटुबच्या माध्यमातून जगात पाहिल्या गेल्या. याचे संपुर्ण श्रेय सुधागडवासीयांना जाते. रायगड जिल्ह्याची ओळख कबड्डीची पंढरी म्हणून होती, आहे व यापुढेही राहिल.कबड्डी खेळात कोणतेही राजकारण आणणार नाही. येवू देणार नाही. देशाला प्रो कबड्डी खेळाडू देण्याची मक्तेदारी फक्त इतर जिल्ह्यांची नाही तर आता रायगड जिल्ह्यातून देखिल प्रो कबड्डी स्टार खेळाडू निर्माण करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जातील. यावेळी आदेश बांदेकर आपल्या म्हणाले की कबड्डी हा तांबड्या मातीतील मर्दानी व रांगडा खेळ असून सध्या हा खेळ देशविदेशात लोकप्रीय ठरत आहे. या अस्सल मातीतील खेळाला सध्या ग्लॅमर प्राप्त झाले आहे. 

यावेळी धनराज पिल्ले म्हणाले की रायगड जिल्ह्यातील पालीत राज्यस्तरीय स्पर्धा भरवून जिल्ह्यासह राज्यातील कबड्डीपट्टुंना प्रोत्साहन देण्याचे काम प्रकाश देसाई व सचिन कदम यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता त्यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. नामवंत खेळाडूंनी जिव ओतून आपल्या क्रिडाकौशल्याचे उत्तम सादरीकरण केले.यातूनच दर्जेदार असा खेळ कबड्डीप्रेमींना पाहावयास मिळाला. मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जिवनात पुढे जाण्यास मोलाचे सहकार्य केले. ते मी कधीच विसरणार नाही. माझ्या हद्यात भगवा असल्याचे शेवटी धनराज पिल्ले म्हणाले. या स्पर्धेसाठी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर,राष्ट्रीय कबड्डी पंच भगवान शिंदे व राजयोगी मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी या स्पर्धांच्या नियोजनाचे काम पार पाडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com