मशरुम कंपनीच्या दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण, आमरण उपोषणाचा इशारा

अमित गवळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील करंजघर हद्दीत असलेल्या जिवा फुड्स मशरुम कंपनीतून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे खवली, विडसई ग्रामस्त हैराण झाले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 5) पाली-सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांना तक्रार निवेदन दिले.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील करंजघर हद्दीत असलेल्या जिवा फुड्स मशरुम कंपनीतून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे खवली, विडसई ग्रामस्त हैराण झाले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 5) पाली-सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांना तक्रार निवेदन दिले.

यासंदर्भात तत्काळ कोणतीही कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा विडसई, खवली, करंजघर ग्रामस्थांनी दिला आहे. दुर्गंधीच्या मुद्द्यावर येत्या दोन दिवसात कंपनी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याची माहिती निवेदनकर्ते नितीन वाघमारे व अन्य ग्रामस्तांनी दिली. यावेळी नितीन वाघमारे, प्रशांत वाघमारे, संजय कमलाकर वाघमारे, महेश वाघमारे, निखिल कांबळे, प्रथमेश वाघमारे, सिध्दांत गायकवाड, रवि महाडीक आदिंसह ग्रामस्थ, आदिवासी बांधव उपस्थित होते. सुधागड तालुक्यात करंजघर येथील आठ एकर जागेत अपुर्व भुपेंद्र शहा यांची जिवा फुडस कंपनी सुरु आहे. या कंपनीतून कुजलेल्या कचर्‍यासारखी दुर्गंधी येत असून यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थीतीत गावात माश्या वाढल्या असून याचा नागरीकांना प्रचंड त्रास होत असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या दुर्गंधीवर वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास पाली सुधागड तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

निवेदनकर्ते नितीन वाघमारे यांनी सांगितले की, येथील ग्रामस्थांचा कारखान्याला मुळीच विरोध नाही. कोणताही कारखाना जगला तरच कामगार जगतात. हे जरी खरे असले तरी जनतेच्या आरोग्याशी व जिवाशी न खेळता अशा प्रकारची असह्य दुर्गंधी रोखण्याच्या दृष्टीने कंपनी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरुन स्थानिकांना रोजगार मिळेल व कामगारांसह नागरीकांचे आरोग्य देखील सदृढ व निरोगी राहिल.

सुधागड तालुक्यातील करंजघर येथील जिवा फुडस कंपनीच्या दुर्गंधीबाबत विडसई व खवली ग्रामस्तांची तक्रार आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात कंपनीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाईल व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे पाली-सुधागडचे तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले.

 

Web Title: Marathi news kokan news mushroom factory sting