सावंतवाडी येथे काजू प्रक्रिया उद्योगाच्या अभ्यासासाठी नायझेरीयन पदाधिकारी दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

काजू प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी नायजेरीयन पदाधिकार्‍यांची टिम आज जिल्ह्यात दाखल झाली आहे. 

सावंतवाडी - कोकणातील छोट्या काजू प्रकीया उद्योगाचा आदर्श घेवून नायजेरीयाचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा निर्णय तेथील राजकीय पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. याबाबत या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी नायजेरीयन पदाधिकार्‍यांची टिम आज जिल्ह्यात दाखल झाली आहे.
आज त्यांनी सावंतवाडी पालिकेला भेट दिली. यावेळी कोकण आणि नायझेरीयाचे संस्कृती येथील शेतीत साम्यता आहे. त्यामुळे येथील काजू आंबा आणि नारळ या उत्पादनावर अभ्यास करून नायजेरीयातील युवा पिढीला रोजगार देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. असे नायजेरीयातील बॉसो शहराचे नगराध्यक्ष जफारू मुहम्मद अगवारा यांनी आज येथे दिली.

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग आणि अन्य उत्पादने याबाबत माहिती मिळविण्यासाठी नायजेरीयाच्या चौघा पदाधिकार्‍यांची टिम आजपासून जिल्हा दौर्‍यावर आली आहे. आज त्यांनी येथील पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आफ्रीका युक अ‍ॅग्रीकल्चर आणी ऐनपॉवरमेंट समितीचे अध्यक्ष मुसा सालीहो बावा, समन्वयक ओके इसे इबेकवे आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे या टिमला जिल्ह्यात आणणारे समन्वयत विनय सामंत आदी उपस्थित होते. यावेळी अगवारा म्हणाले आमच्या देशात शेतीच्या बागायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहेत. मात्र त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे तसेच तंत्रज्ञान विकसीत नसल्यामुळे तेथील युवा पिढीवर रोजगाराचे संकट आले होते. मागच्या काही राजकीय परिस्थितीत त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे रोजगार आणि शिक्षणासाठी युवा पिढी बाहेर पडली. मात्र आता परिस्थिती बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोकणात ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काजू मिळतो त्याचप्रमाणे आमचे काजू हे प्रमुख उत्पन्न आहे. मात्र त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. परंतू या ठिकाणी आम्ही येथील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणार असून आमच्या देशात घराघरात असे प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी श्री बावा म्हणाले, 'अमेरीका आणि युरोप सारख्या देशापेक्षा येथील आणि आमची संस्कृती साम्यता आहे. त्यामुळे आम्ही निश्‍चितच तुमच्या संस्कृतीची देवाण घेवाण करू शकतो आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्‍चीतच आम्हाला दोन देशातील संबंध जोडल्याचा फायदा होईल.' यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी त्या पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. तर सौ. कोरगावकर यांनी आभार मानले. यावेळी राजू बेग, दिपाली भालेकर, दिपाली सावंत, सुरेद्र बांदेकर, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, शुभांकी सुकी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, बांधकाम अभियंता तानाजी पालव आदी उपस्थित होते. 

नायजेरीयात काजूचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यावर प्रक्रिया अत्यंत कमी खर्चात होते. हे त्या लोकांना माहीत नाही. या ठिकाणचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा 25 नगराध्यक्षांची टिम या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यानंतर तेथील काही काजू या ठिकाणी प्रक्रियेसाठी आयात करण्याचे आपला मानस आहे किंवा या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले युवक रोजगाराच्या उद्देशाने त्या ठिकाणी पाठवून नायजेरीयातील लोकांना प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे, असे मत समन्वयक विनय सामंत यांनी व्यक्त केले.  

Web Title: marathi news kokan savantwadi nigerian cashew officers study tour