गुजरातच्या लँडमाफियांना मोठे करण्यासाठी रिफायनरी प्रकल्प : खासदार राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

दोन, तीन लाख रुपयांनी जमीन घ्यायची आणि शासनाच्या पॅकेजमधील रकमेने ती विकायची हाच त्यांचा व्यवसाय आहे. त्यातून हे लँडमाफिया गब्बर होणार आहेत. कोकण खाक होणार आणि रांगोळी मात्र गुजरातमध्ये रंगणार अशी स्थिती रिफायनरीमुळे निर्माण झाली आहे. त्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी : नाणार (राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्प हा गुजरातच्या लँडमाफियांना मोठे करण्यासाठी आणला आहे. त्याचा पर्दाफाश आम्ही येत्या काही दिवसांत करणार आहोत. तसेच या प्रकल्पाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे का ते माहिती नाही. ते गुजरातचे असल्यामुळे तो योगायोगही असू शकतो, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच असून, कोकणात कोठेही हा प्रकल्प येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

रिफायनरी प्रकल्प घातक आहे. त्याचा विपरित परिणाम कोकण किनारपट्टीवर होऊ शकतो. त्यासाठी शिवसेनेने त्याला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठी शासनाचा आग्रह म्हणजे कोकण विकासाचा की गुजरातच्या लँडमाफियांच्या विकासाचा असा प्रश्‍न पडला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र दिले आहे. अधिवेशनातही आवाज उठविला आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या अडीच हजार एकर जमिनींपैकी दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँडमाफियांनी खरेदी केली आहे. त्यामध्ये शहा, जैन यांचाही समावेश आहे. शहा मंडळी सर्वाधिक आहेत. या लोकांची नावानिशी यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे राऊत म्हणाले.

दोन, तीन लाख रुपयांनी जमीन घ्यायची आणि शासनाच्या पॅकेजमधील रकमेने ती विकायची हाच त्यांचा व्यवसाय आहे. त्यातून हे लँडमाफिया गब्बर होणार आहेत. कोकण खाक होणार आणि रांगोळी मात्र गुजरातमध्ये रंगणार अशी स्थिती रिफायनरीमुळे निर्माण झाली आहे. त्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही असे त्यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्प येऊ घातल्याचे लक्षात आल्यानंतर जमीन व्यवहार बंद करावयास पाहिजे होते. नियमानुसार ही कार्यवाही करणे गरजेचे होते; परंतु अधिसूचना झाली तरीही खरेदी-विक्री सुरुच ठेवली होती. हे प्रथमच घडले असून गुजरातच्या लँडमाफियांना मोकळे रान मिळावे, यासाठीच केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. 

Web Title: marathi news local news kokan news refinary projects for gujrats landmafia says MP Vinayak Raut