दारूच्या नशेत लावलेली पैज नडली; आंबोलीतील 'ते' सत्य समोर आले!

अमोल टेंबकर
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

दरीत पडलेले दोघे तरूण मद्यधुंद अवस्थेत एकदम 'टल्लू' आहेत. दरम्यान, त्यातील त्याच्यापासून काहीसे लांब असलेल्या गटाने असलेल्या युवकातील एक सहकारी त्या प्रकाराचे चित्रिकरण करत होता. त्याला पाहून संबधित मृत झालेला एक युवक व्हाॅटसअॅपला टाक, असे तब्बल तीन वेळा सांगत आहे. त्याचे हे म्हणणे ऐकून दुसरा मित्र त्याला  शिव्या घालून 'अरे चल, अरे चल' असे सांगून कठडयाच्या दिशेने नेत आहे.

आंबोली : आंबोली कावळेसाद पाॅईटच्या दरीत गडहिंग्लज येथील दोघे पर्यटक पडून मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उघड झाला. मात्र त्यामागे नेमके काय दडले होते, हे बाहेर आले नाही. दिवसभर त्या क्लीपची चर्चा रंगली; परंतू अनेक लोकांच्या सूचनेनंतर ती क्लीप  ऐकल्यानंतर सहकारी मित्रांनी चिथविल्यानंतरच त्यांनी दरीच्या बाजूने जाण्याचे डेअरिंग केले आणि ते दोघे आपल्या प्राणास मुकले, हे या मागचे कटू सत्य.

आतापर्यंत मिळालेली माहिती अशी होती : ते सात जण फिरायला आले होते. त्यातील इम्रान गारदी आणि प्रताप राठोड हे दोघे जण सेल्फी काढताना दरीत कोसळले. हा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेने पाहिला आणि त्यांच्या सहका-यांना माहिती दिली, असे चित्र सहका-यांकडून उभे करण्यात आले होते.

मात्र या बाबतची क्लिप पुढे आल्यानंतर खरा प्रकार उघड झाला. तो असा : दरीत पडलेले दोघे तरूण मद्यधुंद अवस्थेत एकदम 'टल्लू' आहेत. दरम्यान, त्यातील त्याच्यापासून काहीसे लांब असलेल्या गटाने असलेल्या युवकातील एक सहकारी त्या प्रकाराचे चित्रिकरण करत होता. त्याला पाहून संबधित मृत झालेला एक युवक व्हाॅटसअॅपला टाक, असे तब्बल तीन वेळा सांगत आहे. त्याचे हे म्हणणे ऐकून दुसरा मित्र त्याला  शिव्या घालून 'अरे चल, अरे चल' असे सांगून कठडयाच्या दिशेने नेत आहे. त्याला प्रतिकार करीत असताना 'चल' म्हणून दोघे कठड्यावर बसले. यावेळी अन्य मित्रांतील काही युवक त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही त्यांनी माघार घेतल्यानंतर  एकाने 'गेम ओव्हर' असा शब्द वापरला. त्यामुळे त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांनी त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे पुन्हा दोघे कठड्यावर जाण्यासाठी निघाले त्यातील एक जण बाहेर येऊन सहका-याच्या हातात असलेली दारूची बाटली दरीत फेकून देतो आणि 'वर जाऊया' असे सांगतो. मात्र सहकारी त्याला पाण्यात ढकलतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा सहकारी खिल्ली उडवतात. त्यामुळे सगळ्यांनी डिवचल्यानंतर ते पुन्हा दरीच्या दिशेने जात दरीत उडी मारण्याची पैज लावतात. अशा परिस्थितीत आधी संयम दाखविणारा मित्र त्याला उडी मार असे आव्हान देत आहे आणि त्या पैजेच्या नादात एकाचा तोल सुटतो मात्र तो बाजुच्याला धरण्याचा प्रयत्न करत असताना दोघे दरीत कोसळतात.

या सर्व प्रकाराची काही मिनिटे मजा अनुभवणारे सहकारी त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावतात. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता. गंमत म्हणून चाललेली मस्करी एखाद्याच्या जीवावर येईल, असे त्यातील एकालाही वाटले नसावे.परंतू झालेल्या प्रकारानंतर आपण अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी सेल्फीचा बनाव रचला. परंतू त्यानीच काढलेली क्लीप सर्व काही संशय पारदर्शक करून गेली

त्या युवकांच्या मृत्यूस चिथविणारे मित्रच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सावंतवाडीतून झाली आहे.यातून त्यातील काही जणांना अटक होईल,कारवाई होईल हे नक्की.  मात्र हा प्रकार पुढे आल्यानंतर  जीवाची मजा करण्यासाठी आलेल्या त्या युवकांना दारूच्या नशेत मांडलेले गंमतीनंतरचे ते विदारक सत्य आयुष्यभर बोचत राहणार आहे हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi website Amboli Accident