महाराष्ट्र अंनिसच्या “फटाके मुक्त दिवाळी” अभियानाला शासनाची साथ

महाराष्ट्र अंनिसच्या “फटाके मुक्त दिवाळी” अभियानाला शासनाची साथ

पाली : गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर “फटाके मुक्त दिवाळी” अभियान राबवीत आहे. यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयीए जागृती निर्माण होत आहे. यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने “प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान” राज्यभर सर्व शाळांमध्ये राबविण्याचे ठरविले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र अंनिसने स्वागत केले असून महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पर्यावरण विभाग यांचे अभिनंदन व आभार मानले आहे.

फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वी करण्यासाठी दरवर्षी महा.अंनिसचे कार्यकर्त वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करीत आहे. शाळां-शाळांमध्ये जावून फटाक्याच्या दुष्परीणामांची पत्रक वाटणे, व्याख्याने देणे,विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेणे, पथनाट्याचे सादरीकरण करणे, आकाशवाणीवर मुलाखत देणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे, स्लाईड-शोद्वारे प्रबोधन करणे, प्रबोधन फेरीचे आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शन भरविणे यासारखे उपक्रम राबवीत आहे.फटाक्यामुळे होणारे ध्वनी व वायु प्रदूषण, अपघात,करोडो रुपयाचा चुराडा, पर्यावरणाचा ऱ्हास,बालमजुरीचा प्रश्न याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यापारी वर्ग परंपरेच्या भाग म्हणून मोठ्या प्रमाणात फटाके फोडतो,या व्यापाऱ्यांचे प्रबोधन कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रबोधन फेरी काढून केली जात आहे.

अभियानाला मान्यवरांची साथ
या अभियानाला मान्यवर जयंत नारळीकर, एन. डी.पाटील, प्रकाश आमटे, नरेंद्र जाधव, सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर यांनी पाठिंबा दिलेला आहे. या सर्व मान्यवरांची सही असलेले निवेदन पत्र शाळा शाळांमध्ये वाटण्यात येत आहे. या वर्षी तर चक्क महाराष्ट्र शासनाने या अभियानाला पाठिंबा दिला आहे.

लाखो विद्यार्थ्यांनी भरले संकल्प पत्र, करोडो रुपये बचतीचा संकल्प
विद्यार्थ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून प्रदूषण करून स्वतःचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही हे विद्यार्थ्यांना पटवून त्यांच्याकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येत आहे.मअंनिसच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मागील वर्षी दिवाळीत राज्य भरातील १४७० शाळांमधील ५ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनी या अभियानात भाग घेऊन १६ कोटी ९० लाख रुपयांच्या बचतीचा संकल्प केला होता. चालू वर्षी आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, माणगाव, खोपोली, पाली, नागोठणे येथील कार्यकर्त्यांनी १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत संकल्प पत्र पोहोचवले आहे.

फटाके न फोडता वाचलेल्या पैशातुन विधायक कामे
विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करून किमान १०० रुपये वाचवा आणि वाचविलेल्या पैश्यातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देणे, त्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे, सारख्या सामजिक कार्यांसाठी प्रोत्साहित करण्यात येते.फटाक्यांच्या यादुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी समितीने सुरवात केलेले हे अभियान आता व्यापक स्वरुपात महाराष्ट्रातील शाळा-शाळांमध्ये यशस्वीपणे राबविले जात आहे. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता वाचविलेल्या पैश्यातून शाळेच्या वाचनालयाला दिली, काही विद्यार्थ्यांनी या वाचलेल्या पैश्यातून वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना चप्पल व बॅगा दिल्या, काही शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बनविलेले दिवाळीचे पदार्थ आणले व झोपडपट्टीतील मुलांना देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.

सोशल मीडियातून जनजागृती
समितीतर्फे फेसबुक, ट्विटर, वॅाटस्अपद्वारे फटक्याच्या दुष्परिणामांची माहिती प्रसारित करणे. यासारख्या अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहचता येते.

'महाराष्ट्र अंनिस मार्फत राबविल्या जाणार्‍या फटाके विरोधी अभियानाला शासनाने मान्यता दिल्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार, तसेच सर्वांनी फक्त दिवाळीतच नाही तर वेगवेगळ्या धर्मातील सणांच्या दिवशी, निवडणुका, मिरवणूक, नेत्यांचे वाढदिवस अशाप्रसंगी प्रदूषणकारी फटाक्याचा वापर टाळावा असे आवाहन करत आहे.'
- मोहन भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अंनिस जिल्हा रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com