मुंबई गोवा महामार्ग दुरवस्थेबद्दल मार्मिक टीका व विनोद

अमित गवळे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. अर्ज, विनंत्या केल्या गेल्या. परंतु त्यामुळे काही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे महामार्गाच्या परिस्थितीवर मार्मिक टिका व भाष्य करून लक्ष वेधत आहेत.

पाली (रायगड) : मुंबई गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरू असलेले व अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. याचा त्रास वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाश्यांना होत आहे. या महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात सोशल मीडियावर मार्मिक टिका व विनोद व्हायरल होत आहेत. कोकणाला जोडणार हा महत्त्वपूर्ण महामार्ग आता तरी शासनाने लवकर पूर्ण करावा अशी मागणी हतबल झालेले सामान्य नागरिक करत आहेत. 

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या दुरवस्थेमुळे रोजच होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण या महामार्गाने घेतले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. अर्ज, विनंत्या केल्या गेल्या परंतु त्यामुळे काही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे महामार्गाच्या परिस्थितीवर मार्मिक टिका व भाष्य करून लक्ष वेधत आहेत. तसेच सरकारवरदेखील नाराजी व्यक्त करीत आहेत. या टिका व विनोद गमतीशीर वाटत असल्या तरी सर्वांनाच विचार करायला लावणाऱ्या आहेत. शासनाने आत्मपरीक्षण करुन आता तरी हा मार्ग लवकर सुस्थितीत करावा असेच अनेकांचे गाऱ्हाणे आहे.

मी नियमित या महामार्गावरून प्रवास करतो. कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम खोळंबले आहे. याबाबत सामान्य माणुस आपली दाद कोणासमोर मागणार? मग सोशल मीडियामधून या रस्त्यासंदर्भातील राग व गाऱ्हाणे व्यक्त केले जात आहे. आता तरी प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन वेळीच या महामार्गाची दुरूस्ती करावी. ही विनंती. असे मत वडखळ मधील प्रवासी गिरीश म्हात्रे यांनी मांडले.   

सोशल मीडियावरील व्हायरल विनोद व टीका -

१) मला संधी वाताचा त्रास होता. माझी सर्व हाडे अखडून गेली होती. त्याचा खूप त्रास होत होता, बऱ्याचशा डॉक्टरांना दाखवून पण काहीच फायदा झाला नाही. मग मी मुंबई-गोवा महामार्गाने माणगाव ते पनवेल प्रवास केला. आता मला खूप छान वाटतंय. आखडलेली सर्व हाडे मोकळी झाली आहेत. होय मी लाभार्थी, हे माझं सरकार…

२) पनवेलचे डॉक्टर पेणच्या डॉक्टरांवर नाराज…त्यांनी पाठविलेले मुतखड्याचे पेशंट पनवेलपर्यंत पोहोचतच नाही.…शोध घेतल्यावर लक्षात आले...मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यांमुळे मुतखडा आपोआप खाली पडतो.…होय मी लाभार्थी.…

३) मुंबई-गोवा हायवे, किती जीव घेणार? कोकणचा हायवे किती पाहू मोदीजी तुमचा विकास, मुंबई-गोवा हायवे झालाय भकास...कोकणचेच बनविलेत अवजड मंत्री, विचारा त्यांना येथे रोज किती मरती...विकासाच्या नावावर परदेशात फिरा झकास, पण मंत्र्यांना विचारा महामार्ग कसा आहे खास...आम्हाला नको तुमच्या कर्जाची माफी, कोकणात नाही ठेवत कोणी थकबाकी...आमची लेकरं मुंबईला पोट भरतात, याच रस्त्याने जीव वाचले तर परततात...असे किती घेणार खड्यात आमचे जीव?...तुमची जाहिरातबाजी पाहून येते कीव..

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Marathi news Mumbai Goa Highway jokes