मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर रस्त्यांची कामे आमचीच!

अमित गवळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पाली : सुधागड तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर झालेली कामे आम्हीच आणली असल्याचा दावा तालुका भाजपने केला आहे. गुरुवारी (ता. ११) येथील भाजप संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेकाप या कामांचे खोटे श्रेय लाटत असल्याचे सांगण्यात आले. 

पाली : सुधागड तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर झालेली कामे आम्हीच आणली असल्याचा दावा तालुका भाजपने केला आहे. गुरुवारी (ता. ११) येथील भाजप संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेकाप या कामांचे खोटे श्रेय लाटत असल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुधागड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांच्या विकासाकरीता मंजूरी देण्यात आली आहे. सन 2017-18 व 2018-19 या वर्षासाठी कामांची अंतीम मंजूरी नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. सुधागड तालुक्यातील राज्य महामार्ग 94 ते झाप आपटवणे, भावशेत ठाकूरवाडी, राज्य महामार्ग 93 ते कान्हीवली, वांद्रोशी, भैरव फाटा ते कुंभारघर रस्ता आदी रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. सदर रस्त्यांना शे.का.प.च्या माध्यमातून मंजूरी मिळाली असल्याचे शेकाप आमदार धैर्यशिल पाटील व पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. 

नव्याने होणार्‍या रस्त्यांचे सर्वेक्षण धैर्यशिल पाटील यांच्याकडून करण्यात आले असून ही कामे आम्हीच आणल्याचे जनतेत भासविले जात आहे. परंतू मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी झालेल्या रस्त्यांचे श्रेय शेकापने लाटू नये, असा इशारा देत सदर रस्त्यांची कामे भाजपच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने आली असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. 

यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत यांनी सांगिलतले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांना मंजूरी मिळून टेंडर होण्याची प्रक्रीया पूर्ण झाली नसताना या कामांचे श्रेय घेण्यासाठी प्रस्थापितांची सुरु असलेली धडपड केविलवाणी आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रीया पूर्णत्वास येईल त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता व भाजप रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भुमिपूजन व उद्घाटन केले जाईल. पाली नगरपंचायत होण्यासाठी असलेले अडथळे दूर करुन पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त व्हावा याकरीता आम्ही प्रयत्नशिल आहोत. असे राऊत यांनी सांगितले. 

सुधागड तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, समाजमंदिरे यामध्येच प्रस्थापीत पुढार्‍यांनी आजवर विकास अडकवून ठेवला आहे. भाजपाला यापुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर विकास साधून तालुक्याचा सर्वांगिण विकास साधायचा आहे, असे मपारा म्हणाले. सुधागडातील अस्ताकडे निघालेले राजकीय पक्ष अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. जनतेने कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन देखील राजेश मपारा यांनी यावेळी केले. याबरोबरच पाली गावची शुध्दपाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लावली जाणार आहे. पाली बायपास, ग्रामीण रुग्णालय आदी प्रलंबीत कामे मार्गी लावली जातील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेत भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत, सुधागड तालुका भाजप अध्यक्ष राजेश मपारा, चंद्रकार घोसाळकर, सुधागड तालुका उपाध्यक्ष सुरेश सकपाळ, सुधागड तालुका सरचिटणीस आलाप मेहता, सुधागड तालुका सरचिटणीस शिरिष सकपाळ, समन्वय समिती सदस्य आरती भातखंडे, निहारीका शिर्के, ओ.बी.सी सेल अध्यक्ष सुशिल थळे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष गौसखान पठाण, राजेंद्र खरिवले, रविंद्र जंगम, प्रमोद पावगी, विजय देशमुख, प्रकाश पालांडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news raigad news mukhyamantri gramsadak yojana