वाकण पाली खोपोली मार्ग रुंदीकरणात योग्य मोबदला द्या

अमित गवळे
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्यास दिरंगाई होत असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी) व सबंधित ठेकेदारांच्या विरोधात पाली-सुधागड तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

पाली : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (ए) या 41 किमी. मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. या भूसंपादत बाधित शेतकर्‍यांना शासनामार्फत योग्य मोबदला मिळावा याकरीता सुधागड तालुका शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (ता.१९) उपोषण सुरु करण्यात आले आहे. 

बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्यास दिरंगाई होत असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी) व सबंधित ठेकेदारांच्या विरोधात पाली-सुधागड तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
 
उपोषणकर्त्यांची ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शिवमती वंदना मोरे, भा.ज.प. सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, भा.ज.प. जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, रि.पा.ई. सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, बहुजन विद्यार्थी संघटनेचे सिध्दांत गायकवाड, विकी रोकडे, भगवान शिंदे, प्रकाश ठोंबरे, राजेंद्र गांधी, किरण भगत, शिरिष सकपाळ, राजा काटकर, नंदकिशोर शिंदे आदिंसह महामार्गालगतचे बाधित शेतकर्‍यांनी भेट घेतली व उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) काळ प्रकल्प यांच्या माध्यमातून व महसूल प्रशासनामार्फत शेतकरी संघर्ष समन्वय समितीला भूसंपादन निवाडे कलम 6 अधिसुचना एल.आर.प्रमाणे कागदपत्रे देण्यात आली आहेत. 

पेडली, कानसळ, परळी, बलाप, तिवरे, रासळ, आंबोले येथील 8 गावातील शेतकर्‍यांच्या भुसंपादनाबाबत दिलेल्या कागदपत्रात 156 शेतकर्‍यांच्या सह्या नसल्याची माहिती प्रमोद मोरे यांनी दिली. दरम्यान जमिन मिळतीत अतिक्रमण व उत्खनन होत असल्याबाबत विजय महादेव जगताप यांनी पाली तहसिलदार व पोलीस स्थानकांत तक्रार दिली आहे.

रस्ता रुंदीकरणादरम्यान भूसंपादन करताना ग्रामस्थांच्या प्रश्नांचे व शंकांचे निराकरण आणि समाधान करण्यात यावे. सरकारकडून जमिनीचा मिळणारा योग्य भाव मिळावा. तसेच ज्यांचे व्यवसाय नष्ट होणार आहेत. त्यांना व्यवसायाकरीता पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. कोकणातील शेतकर्‍यांचा विकासाला विरोध नाही परंतू, भुसंपादनादरम्यान जमीनीला योग्य तो भाव मिळावा ही आमची आग्रही मागणी असल्याचे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले. पाली खोपोली मार्ग दुपरीकरणात 10 मीटर साईटपट्टीचे काम होणार आहे. याकरीता 200 कोटीचा उपलब्ध झाला असून त्याद्वारे दुपदरीकरण प्रक्रीया सुरु आहे.

शेतकरी व बाधितांचा असंतोष शेतकर्‍यांना कुठलाही मोबदला न देता, शेतकर्‍यांना नोटीस न देता, विश्वासात न घेता या रुंदीकरणात ज्या स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतजमीनी, व्यवसायिक दुकाने, व घरे बाधीत होत आहेत, त्या शेतकर्‍यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीचा अहवाल देवून शेतकर्‍यांचे नुकसान केला आहे.

याबाबत शेकाप आमदार धैर्यशिल पाटील, व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका पार पडल्या आहेत. या बैठकीत शेतकर्‍यांच्या मागणीनुसार रस्ता नकाशा (सा.बां.खाते), टी.आर.एल, 1974 चे सातबारा क.ज.प झालेले शेतकर्‍यांची नावे व क्षेत्र, रक्कम पावती, कुठल्या शेतकर्‍यांनी पेमेंट व सही केली ती नावे, प्रत्येक गावातील केलेल्या गट क्रमांक व नाव, निविदा पत्रक नक्कल प्रत ही सर्व कागदपत्रे देण्याची सुचना केली असताना देखील कागदपत्रे देण्यास उशीर केला. तसेच या कागदपत्रात अनेक त्रुटी असून यामध्ये शेतकर्‍यांच्या सह्या नाहीत, काही गट नंबर आले नाहीत, क.ज.प झाले नाही, दिलेल्या पेपरमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

याबाबत प्रांताधिकारी यांनी आश्वासन दिले होते की मोजणी हद्दी व नोटीस काढल्यानंतर काम सुरु करण्यात येईल. परंतू आज घडीला रस्तारुंदीकरणाचे काम सुरु असल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण आहे. शेतकर्‍यांचे जमीनीचे नुकसानभरपाई व सर्व पेपर साक्षांकित (निविदा पत्रक) व मोजणी हद्दी कायम झाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरु करु नये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

पाली खोपोली मार्ग रस्ता रुंदीकरणादरम्यान प्रशासन व ठेकेदारांनी मनमानी थांबवावी. वाकण पाली खोपोली मार्गालगत बाधीत शेतकर्‍यांच्या नावे सातबारा आहे. कुठेही क्षेत्र वजा नसताना क.ज.पा नसताना धारा शेतकरी भरत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 1974 मध्ये भुसंपादन प्रक्रीयेत अनेक त्रुटी ठेवल्या असून सद्यस्थितीत रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केला आहे. रूंदीकरणादरम्यान बाधीत शेतकर्‍यांचे यात मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना शासनाच्या नवीन धोरणानुसार योग्य मोबदला मिळावा. बाजारपेठेलगतची दुकाने, घरे यांची जमीन मोजणी करुन हद्द कायम करावी. यामध्ये स्थानिक शेतकरी, भुमिपुत्रांचे मोठे नुकसान होउन अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्‍यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसानभरपाई मिळावी. जोपर्यंत बाधीत शेतकर्‍यांना शासनामार्फत योग्य ती नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहिल, असे शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे सुधागड तालुका अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सांगितले.   

 

Web Title: Marathi news raigad news wakan pali khopoli highway