खैराची लाकडे वाहुन नेणाऱ्या दहा जणांना अटक

अमित गवळे 
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास जंगलातून खैराची लाकडे भरलेली पिकअप व्हॅन पकडण्यात आली. जप्त केलेल्या खैराच्या लाकडांची किंमत साधारण पंचवीस हजार रुपये आहे. मुख्य आरोपी व नऊ जणांना अटक केली आहे.  

पाली - सुधागड तालुक्यातील कळंब येथील राखीव वनातून बेकायदेशीररित्या खैराचे लाकडे वाहून नेणारे पिकअप वाहन मंगळवारी (ता.5) पहाटे 4.30 वाजता पाली परिक्षेत्र वन अधिकारी समीर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले. महाड तालुक्यातील निगडे येथील मुख्य आरोपी व नऊ जणांना अटक केली आहे.

गुह्यातील संबधितांना पाली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. जप्त केलेल्या खैराच्या लाकडांची किंमत साधारण पंचवीस हजार रुपये आहे. या प्रकरणात महाड तालुक्यातील निगडे येथील दिलीप माने व त्याचे साथीदार चालक अरुण तिरके (महागाव, गोमाशी वाडी, ता. सुधागड), मधुकर शीद (गौळमाळ, ता. सुधागड) तसेच सुधागड तालुक्यातील कळंब येथील कल्पेश चौधरी, कृष्णा पवार, परशुराम बागडा, वसंत घोगरकर, रवी हिलम, लक्ष्मण घोगरकर, विठ्ठल पवार यांना अटक करण्यात आली आहे.         

पाली परिक्षेत्र वन अधिकारी समीर शिंदे यांनी सांगितले की, कळंब येथे राखीव वन 609 मध्ये खैराचे लाकूड घेण्यासाठी पिकअप व्हॅन जंगलात घेऊन गेल्याची गुप्त बातमी मिळताच आम्ही वनातील कच्च्या रस्तावर रात्री दबा धरून बसलो. पाली परिक्षेत्र वन अधिकारी समीर शिंदेसह कळंबचे परिमंडळ अधिकारी बापू गडदे व त्यांचे सहकारी वनरक्षक एस.ए.डोंगरे, एस.बी.चव्हाण, एम.एच.पाटील या टीमने ही कारवाई केली. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास जंगलातून खैराची लाकडे भरलेली पिकअप व्हॅन पकडण्यात आली. यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी इतर आरोपींचे नावे सांगितल्यावर त्यांनाही तातडीने अटक करण्यात आली. 

 

Web Title: Marathi News_Ten people carrying Khaira's wood were arrested

टॅग्स