‘सागरी गोल्ड’ घोल मासा मिऱ्या किनारी

राजेश कळंबटे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर पावसामध्ये सापडणाऱ्या घोल माशातून येथील अर्थकारणाला चालना मिळते आहे. ऑपरेशनसाठी वापरायचा दोरा तयार करण्यासाठी घोलचे फुफ्फुस उपयुक्‍त असल्याने किलोला आठशे ते एक हजार रुपये दर या माशाला मिळतो आहे. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर घोल मासा सापडत आहे.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर पावसामध्ये सापडणाऱ्या घोल माशातून येथील अर्थकारणाला चालना मिळते आहे. ऑपरेशनसाठी वापरायचा दोरा तयार करण्यासाठी घोलचे फुफ्फुस उपयुक्‍त असल्याने किलोला आठशे ते एक हजार रुपये दर या माशाला मिळतो आहे. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर घोल मासा सापडत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस प्रजननासाठी मासे किनारी भागात येतात. त्यामुळे जून, जुलै या दोन महिन्यात मासेमारी बंद ठेवली जाते. कोकण किनाऱ्यांवर बांगडा, पापलेट, चिंगळे, सुरमई यासारखी मासळी मिळते.

मत्स्य व्यवसायावर येथील अर्थकारण चालते. त्यात घोल समुद्री मत्स्यनाशकांमध्ये सर्वात मौल्यवान जातींपैकी एक आहे. त्याचे हृदय ‘सागरी गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. त्याचा उपयोग विविध औषधे बनविण्यासाठी केला जातो. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्‌टीवर हा मासा आढळतो. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर गेले काही दिवस मच्छीमारांना घोल मासा सापडत आहे. दिवसाला दोन ते चार मासे छोट्या मच्छीमारी नौकांना मिळत आहेत.

खडकाळ भागात ही मासेमारी करताना मच्छीमारांना सतर्क राहावे लागते. पावसाळा संपेपर्यंत हे मासे मिळतात. येथील किनाऱ्यावर ९ ते १३ किलोचा मासा सापडतो. त्याची किलोला ८०० ते १००० रुपये किंमत आहे. हा मासा मिरकरवाडा येथील व्यापाऱ्यांना विकला जातो. तेथून तो निर्यातही केला जातो; परंतु कमी प्रमाणात मासा मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत किनारी भागात आढळत असलेला समुद्री गोल्ड पकडण्यासाठी मच्छीमार मिऱ्याच्या डोंगरी भागाकडे वळत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून याला मागणी आहे.

पावसाळ्यात घोल मासा किनाऱ्यावर येतो. खडकाळात ते अंडी घालत असून पावसानंतर तो मिळत नाही.
- बाळा पेडणेकर,
मच्छीमार, मिऱ्या

विशिष्ट जाळ्यांचा वापर
घोल मासा पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांचा वापर केला जातो. मासा जाळे तोडून जाऊ नये यासाठी त्याची साव जाड असते. माशांचे तोंड मोठे असल्यामुळे जाळे तोडून जाऊ नये यासाठी त्याचा व्यास मोठा असतो. जाळे ८ ते ९ मीटर उंचीचे असते.

Web Title: Marine Gold Epinephelus itajara on Mirya Beach