Ratnagiri : राजापुरात लढतींची गणितं बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात लढतींची गणितं बदलणार
राजापुरात लढतींची गणितं बदलणार

राजापुरात लढतींची गणितं बदलणार

राजापूर : राजापूर नगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्याचवेळी प्रभागांची संख्याही वाढणार आहे. नगर पालिकेची प्रस्तावित असलेल्या हद्दवाढीला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याने सद्यस्थितीत असलेल्या पाच प्रभागांची फेररचना होऊन त्यातून नव्याने दोन प्रभागांची निर्मिती होणार आहे. लोकसंख्येच्या नव्या निकषाप्रमाणे नगरसेवक संख्या आणि प्रभागसंख्या वाढणार असल्याने निवडणूक लढतींची सारीच गणितं बदलून गेली आहेत.

डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या येथील नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीबाबत प्रशासकीय स्तरावर निवडणूक पूर्वतयारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये द्विसदस्यीय प्रभागरचना राहणार असल्याचे निश्‍चित मानले जात असताना आता लोकसंख्यावाढीच्या निकषावर नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे. तीनची वाढ होऊन वीस नगरसेवक असतील. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून १७ नगरसेवक संख्या आणि संभाव्य प्रभागरचना डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यामध्ये कोणत्या प्रभागातील कोणता भाग आणि मतदार नव्या प्रभागामध्ये समाविष्ट होणार यांची इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना उत्सुकता लागून राहिली आहे.

गेल्या काही वर्षापासून नगर पालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित राहिलेला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीमध्ये असलेल्या पाच प्रभागांमधून दोन नव्या प्रभागांची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, कोणत्या प्रभागातील कोणता भाग आणि कोणते मतदार नव्या प्रभागामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत, नव्या प्रभागाचे क्षेत्र नेमके कसे असणार आहे, याबाबत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नगरवसेवक आणि प्रभागसंख्या वाढणार असल्याने अनेक इच्छुकांना नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली असली तरी प्रभागरचना निश्‍चित झालेली नसल्याने मोर्चेबांधणी करताना इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातून, सद्यःस्थितीमध्ये इच्छुकांकडून प्रभागरचना निश्‍चित झाल्यानंतरच पाहू, अशी वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका घेतली जात आहे.

loading image
go to top