माथेरानची 'मिनी ट्रेन' पुन्हा रुळावर येणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

माथेरान - आबालवृद्ध पर्यटकांचे आकर्षण आणि माथेरानची जीवनवाहिनी असलेली "मिनी ट्रेन'सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार लोहमार्गाची दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी रेल्वे मंत्रालयाने सात कोटी रुपये इतका प्रकल्प निधी मंजूर केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी बुधवारी दिली.

पाटील म्हणाले, 'या गाडीसाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना निश्‍चित केल्या आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशांनुसार निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारही यासाठी निधी देणार आहे. सुरक्षिततेचे उपाय म्हणून पाच हजार 650 मीटर लांबीचे संरक्षक कठडे उभारले जाणार आहेत. 1,500 मीटर लांबीची संरक्षक भिंतही उभारली जाणार आहे. 500 मीटर लांबीची दगडी भिंत बांधली जाणार आहे. याशिवाय सर्व डबे आणि इंजिन एअर ब्रेक प्रणालीने परिपूर्ण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. लोहमार्ग सुरक्षित करण्याचे काम सुरू झाले आहे.''

सध्या मिनी ट्रेनसाठी एअर ब्रेक प्रणालीसाठी योग्य असे 600 अश्वशक्तीचे एक इंजिन आणि आठ डबे आहेत. पहिल्या टप्प्यात अमन लॉज ते माथेरान शटलसेवेसाठी त्यांचा वापर केला जाईल. रेल्वेचे विभागीय अभियंता आणि सहायक अभियंत्यांनी मंगळवारी (ता. 10) नेरळ येथील लोकोशेडला भेट दिली. दुरुस्तीचे काम वेगाने व्हावे यासाठी दोन दिवसांत मालगाडी सुरू होणार असल्याचे समजते.

मे 2016 मध्ये लागोपाठ दोन वेळा मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याने ही सेवा आणि अमन लॉज ते माथेरान शटलसेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्याचा विपरीत परिणाम पर्यटन आणि जनजीवनावर झाला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्र्यांना भेटून ही सेवा पूर्ववत करण्याची विनंती केली होती.

Web Title: matheran mini train