मटका... अन्‌ बदलीच्या विषयाची कणकवलीत चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

कणकवली - मटका बंद म्हणजे बंद, असे सांगणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून मटका अड्डे सुरू आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत मात्र शहरातील दोन बीट अंमलदारांचा बळी पोलिस अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे गेला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. हवालदार आणि शिपायांच्या बदल्या करून अवैध धंदे थांबणार का, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अवैध धंदे रोखले जातील, असे सांगितले गेले. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अवैध धंद्याला जिल्ह्यात थारा देणार नाही, असे सांगून हातातील पोलिस यंत्रणा कामाला लावली. परंतु गेल्या अडीच वर्षांनंतरही मटका, जुगार, गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. कणकवलीसारख्या शहरात तीन पत्ती जुगारावर छापा टाकून बड्या व्यावसायिकांच्या मुलांवर कारवाई झाली. तरीही तीन पत्तीचा जुगार सुरूच आहे. 

शहर आणि ग्रामीण भागातील सर्व पोलिस चौक्‍यांच्या हद्दीत राजरोस मुंबई आणि कल्याण मटका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही, असे चित्र आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषणने दोन- तीन महिन्यांतून एकदा मटका व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर त्या परिसरातील बीट अंमलदारांच्या बदल्या होत असतील तर संवेदनशील बीट पोलिस स्वीकारणार का, असाही सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. गेली कित्येक दशके मटका आणि गोवा बनावटीची दारू हा अवैध धंदा पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरूच आहे. सत्ता कुणाचीही असो आम्ही कुणालाही मॅनेज करू शकतो, अशा थाटात अवैध धंदेवाल्यांचा रुबाब आहे, ही वस्तुस्थिती पोलिसांना नाकारता येणार नाही.

Web Title: matka, transfer discussion in kankavli