नगराध्यक्षांच्या कास्टिंग व्होटने आघाडीला तारले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

राजापूर - राज्यातील भाजपप्रणीत राज्य शासनाने नगराध्यक्षांना जादा मताचा अधिकार (कास्टिंग व्होट) देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत आघाडीला झाला. नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांचे मत निर्णायक ठरून उपनगराध्यक्षपदी ॲड. जमीर खलिफे विजयी झाले. शिवसेनेच्या स्वाती बोटले पराभूत झाल्या. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शिवसेनेला भाजपची साथ मिळाली.

निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले. सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या भाजपचा एकमेव सदस्य सभागृहात तटस्थ राहील, त्याचा फायदा आघाडीला मिळेल, अशी अटकळ होती; मात्र गोविंद चव्हाण यांनी शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे आगामी काळात युती होईल, अशी चर्चा सुरू झाली.

राजापूर उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी नाथ पै सभागृहात आज बैठक झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून ॲड. खलिफे यांनी अपेक्षेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून स्वाती बोटले यांनी अर्ज दाखल केला.  हात वर करून घेतलेल्या मतदानात काँग्रेसचे ॲड. खलिफे यांना काँग्रेसच्या नगराध्यक्ष श्री. काझींच्या मतासह आठ आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांचे एक अशी नऊ मते मिळाली. शिवसेनेच्या सौ. बोटले यांना शिवसेनेची आठ आणि भाजपचे एक अशी नऊ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते झाल्याने पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष श्री. काझी यांनी जादा मताच्या अधिकाराचा वापर करून श्री. खलिफे यांना मत दिले. त्यामुळे ॲड. खलिफे विजयी झाले. 

खलिफे विजयी झाल्याचे घोषित होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जल्लोष केला. जवाहर चौकामध्ये फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. ॲड. खलिफे यांनी आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष हनिफ काझी यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. 
या वेळी आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदानंद चव्हाण, तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर, प्रसाद मोहरकर, विलास पेडणेकर, प्रकाश आमकर, मंदार सप्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार राजन साळवी यांनीही श्री. खलिफे यांचे अभिनंदन केले.

Web Title: mayor election