आता पिण्याच्या पाण्याचे गावोगावी होणार मोजमाप 

प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 30 मार्च 2017

मालवण - पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात पाण्याचा अपेक्षेपेक्षा अधिक, तसेच अनावश्‍यक वापर केला जातो. त्यामुळे भविष्यात टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची भीती आहे. पाण्याचा होत असलेला अतिवापर, गैरवापर टाळण्यासाठी येत्या काळात सर्व तालुक्‍यांमध्ये पाण्याचा हिशेब (वॉटर अकौंटिंग) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. 

मालवण - पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात पाण्याचा अपेक्षेपेक्षा अधिक, तसेच अनावश्‍यक वापर केला जातो. त्यामुळे भविष्यात टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची भीती आहे. पाण्याचा होत असलेला अतिवापर, गैरवापर टाळण्यासाठी येत्या काळात सर्व तालुक्‍यांमध्ये पाण्याचा हिशेब (वॉटर अकौंटिंग) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. 

बहुसंख्य तालुक्‍यांतील गावागावांत नळपाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. शिवाय विंधन विहिरी, तसेच सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्वी गावांमधील परिस्थिती पाहता खासगी विहिरी, सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरींची संख्या अत्यल्प होती. त्याकाळी टंचाईची समस्या भेडसावत नव्हती. गेल्या काही वर्षांत मात्र गावागावांत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विंधन विहिरींमुळे टंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे. खूप खोलवर मारण्यात आलेल्या विंधन विहिरींवरून काही सेकंदांत मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा बागायतींनाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यात पाण्याचा अतिवापर, तसेच अनावश्‍यक वापर होत असल्याचेही दिसून आले आहे. 

भूगर्भातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. एकीकडे विंधन विहिरींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. नळपाणी योजना, तसेच विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांवर मीटर नसल्याने पाण्याचा अनावश्‍यक वापर होत आहे. दुसरीकडे पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. यावर मात करण्यासाठीच शासनाने गावागावांत पाण्याचे मोजमाप (वॉटर अकौंटिंग) करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार गावची लोकसंख्या, गावात पाण्याचे उपलब्ध असलेले स्त्रोत, पाणी वापरणाऱ्यांचे प्रमाण याचे मोजमाप केले जाणार आहे. पाण्याचा होत असलेला अतिवापर रोखण्यासाठीच शासनाने हे पाऊल उचलले आहे. यात पाणीपुरवठा योजनांवर मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. मीटर सक्तीमुळे पाण्याचा अतिवापर, अनावश्‍यक वापर टाळता येणार आहे. 

मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले, ""पाण्याचा अतिवापर रोखण्याबरोबर भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे मोजमाप (वॉटर अकौंटिंग) करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार येत्या काळात तालुक्‍यातील सर्व गावांमध्ये पाण्याचे मोजमाप करण्यात येणार आहे. टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत तालुक्‍यातील विविध गावांमध्ये रेन हॉर्वेस्टिंगसारखे उपाय यशस्वी राबविले आहेत. छतावर पडणारे पावसाचे पाणी बंदावस्थेत असलेल्या विंधन विहिरींच्या ठिकाणी सोडून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यावर भर देण्यात आला आहे. विंधन विहिरी पुनर्जिवित करण्यात आल्या आहेत. तालुक्‍यातील सर्व गावांमध्ये रेन हॉर्वेस्टिंगचे प्रकल्प उभारण्यात यावेत, यासाठी प्रयत्न राहणार आहेत. पाण्याचा अतिवापर रोखण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांवर मीटर बसविणे सक्तीचे केले आहे. सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना दिल्या आहेत.'' 

Web Title: The measure will be the towns drinking water