रत्नागिरीत औषधांच्या साठ्याला संशयाचा वास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अशाप्रकारे औषधाची कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले.

रत्नागिरी : कोल्हापूर येथून सोमवारी (5) सायंकाळी रत्नागिरीत आलेल्या औषधांच्या साठ्याला संशयाचा वास येऊ लागला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नावाने ही औषधे आली असल्याचे पुढे येत आहे; मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अशाप्रकारे औषधाची कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले. हे व्यवहार परस्पर केले असून रुग्णालयाचा त्याच्याशी काही संबंध नाही. 

हेही वाचा - दुधाची तहान ताकावर ; गरज सहाशे शिक्षकांची आणि उपलब्ध मात्र दहाच 

सिव्हिलला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. 
कोल्हापूर येथून औषधाचा साठा घेऊन आलेल्या दोन गाड्यांची जिल्हा प्रशासनाकडून काल  कसून चौकशी झाली. त्या दोन्ही गाड्या खासगी ट्रान्स्पोर्टच्या आहेत. ती औषधे नक्‍की कोणी मागवली आहेत आणि कुठे डिलिव्हरी दिली जाणार आहे, याची कोणतीही माहिती संबंधित वाहन चालकांकडे नाही. त्यामुळे याची सखोल चौकशी केली. 

प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलिस यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत रात्री चौकशी केली. तेव्हा ही औषधे जिल्हा रुग्णालयासाठी आल्याचे समजले; मात्र तसे असेल तर या गाड्या खाली कॉंग्रेसभुवनला कशाला गेल्या? त्याचा जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांशी संबंध आहे का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. सिव्हिलच्या काही कर्मचाऱ्यांनी परस्पर या औषधांची ऑर्डर दिली आहे का? हे देखील या चौकशीत पुढे येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले म्हणाल्या, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून अशी कोणतीही औषधांची ऑर्डर दिलेली नाही. 

हेही वाचा -  खेड तालुक्‍यात कोरोना अजूनही 88 गावांच्या वेशीबाहेरच 

अनेक प्रश्‍न अनुत्तरीत 

कोरोना काळ अतिशय संवेदनशील आहे. त्यात औषधांची अशी परस्पर खरेदी किंवा विक्री होत असल्याचे या प्रकारातून पुढे येत आहे. या प्रकरणातील संबंधितांचा कॉंग्रेस भुवन येथे औषधाचा साठा करण्याचा कट होता का? तिथे कुठे साठा केला जाणार होता. परस्पर या औषधाची विक्री केली जाणार होती का? अशा अनेक प्रश्‍ने अनुत्तरीत आहेत. 

म्हणून संशय बळावला 

कोल्हापुरातून औषधे घेऊन आल्या दोन गाड्या 
कोणी मागवली, डिलिव्हरीबाबत चालक अनभिज्ञ 
कॉंग्रेस भुवन येथे औषध साठ्याचा कट? 
परस्पर औषधाची विक्री होणार होती का?

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medicine not ordered by a ratnagiri hospital but the medicine used in hospital for patients