सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासातील अडथळे दूर

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासातील अडथळे दूर

मालवण - केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्य सरकारच्या लालफितीत गेली अनेक वर्ष अडकलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. यासंदर्भांत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत किल्ल्यासाठी मंजूर झालेला १० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

केंद्र सरकारच्या ॲडॉप्शन ऑफ मॉन्युमेंट फॉर एम्युनिटीज अँड ब्युटीफीकेशन या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे देण्यात येईल, असे पर्यटनमंत्री रावल यांनी स्पष्ट केले. तशा स्वरूपाचे निर्देश संबंधित विभागास तत्काळ दिल्याची माहिती भाजपचे येथील तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
या संदर्भात अलीकडेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. याचे फलित म्हणून मंगळवारी दुपारी २ वाजता पर्यटनमंत्री रावल यांच्या दालनात सिंधुदुर्ग किल्ला विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली होती.

सिंधुदुर्ग किल्ला त्रिशतकोत्तर महोत्सवात किल्ला विकासासाठी ६५ कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री सुरेश मुनगंटीवार यांनी केली होती. त्या स्वरुपाची तरतूद त्यांनी मागील अर्थसंकल्पात केली होती. त्याचा पहिला टप्पा म्हणून किल्ल्यासाठी १० कोटी मंजूर झाले आहेत. या मिटींगमध्ये सदर निधी किल्ला विकासासंदर्भात खर्च करण्यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारच्या ॲडॉप्शन ऑफ मॉन्युमेंट फॉर एम्युनिटीज अँड  ब्युटीफीकेशन या योजनेअंतर्गत किल्ले सिंधुदुर्गचा विकास करावा, अशी संकल्पना मांडली. यात किल्ल्यावर शौचालय, कॅफेटेरीया, जेटी सुशोभिकरण, लॅन्डस्केप गार्डन अशा सोईसुविधा पुरविणाऱ्या योजनांवर चर्चा झाली.

यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीने बनविलेला किल्ल्यासाठी कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्याचा प्रकल्पही सादर करण्यात आला.

सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सिंधुदुर्ग किल्ला विकासाचा आराखडा बनविण्याचे काम भारतीय पुरातत्व सर्हेक्षण विभागास देण्यात आले. यामुळे किल्ल्याचा पर्यटनदृट्या विकास करणे सुलभ आणि जलद होणार आहे. लवकरात लवकर सदर आराखडा पर्यटन मंत्रालयास सादर करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले.

सिंधुदुर्ग किल्ला विकासासाठी माजी आमदार जठार सतत पाठपुरावा करीत आहेत. बैठकीसाठी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, अवरसचिव श्री. पाटणकर, भारतीय पुरातत्व सक्तेक्षण विभागाचे राजेश दिवेकर, ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी श्री. बळीराम रजपूत, किल्ला प्रवासी वाहतूक संघटनेचे स्वप्नील आचरेकर, सुधीर नकाशे उपस्थित होते, अशी माहिती तालुकाध्यक्ष केनवडेकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com