हायवे कामाबाबत कणकवलीवासीय आक्रमक, दिला इशारा...

Meeting on highway work konkan sindhudurg
Meeting on highway work konkan sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्‍यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय. धोकादायक बांधकामामुळे वाहन चालकांसह नागरिकांचाही जीव धोक्‍यात आला आहे. याखेरीज चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून भूसंपादनासह अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्‍न हायवे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवावेत, त्यानंतरच उर्वरित चौपदरीकरणाचे काम सुरू करावे असा निर्णय आज कणकवलीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

येथील तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली हायवे समस्यांच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, तहसीलदार रमेश पवार, भूमी अभिलेखचे एस. जी. गायकवाड, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, उपअभियंता व्ही. एस. पोवार, आम्ही कणकवलीकर संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, ऍड. एन. आर. देसाई, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, दादा कुडतरकर, विनायक मेस्त्री, रूपेश आमडोसकर आदी उपस्थित होते. 

आजच्या बैठकीत ठिकठिकाणी खचलेला महामार्ग आणि होणारे अपघात, उड्डाणपूल जोड रस्त्याची धोकादायक झालेली भिंत, बंद असलेल्या स्ट्रीट लाइट, अपूर्ण राहिलेले सर्व्हिस रोड, शेतकऱ्यांच्या शेतात वाहून जाणारे पाणी, हायवेमुळे बंद झालेल्या पायवाटा आणि इतर मार्गाची डागडुजी, हायवे कामामुळे ठप्प असलेली बीएसएनएलची सेवा, आदी अनेकविध प्रश्‍न उपस्थित लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मांडले. तर हायवे अधिकारी आणि ठेकेदार प्रतिनिधींकडून नेहमीप्रमाणे आठ दिवसांत कामांची पूर्तता करतो अशी ग्वाही देण्यात आली. यावर उपस्थित नागरिकांसह प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी, आधी कणकवली तालुक्‍यात अपूर्ण असलेल्या सर्व कामांची लिस्ट तयार करा. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करा. त्यानंतरच उर्वरित चौपदरीकरणाचे काम सुरू करा असे निर्देश हायवे ठेकेदार आणि हायवे अधिकाऱ्यांना दिले. तर हायवे समस्या दूर झाल्याखेरीज चौपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला. 

काय झाले बैठकीत? 
- प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 
- नागरिकांनी विविध प्रश्‍नांची सरबत्ती 
- धोकादायक बांधकामांमुळे जीव ध्योक्‍यात 
-ठेकेदारांकडून काम पूर्ततेची ग्वाही 
- समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी 

हद्दीची निश्‍चिती करा 
कणकवली शहरासह अनेक गावातील महामार्ग चौपदरीकरणाची हद्द निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे चौपदरीकरण कामात अडथळे निर्माण होत आहेत. बीएसएनएल, महावितरण, नळ योजना आदींच्या लाइन शिफ्ट करतानाही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हायवे हद्दी आधी निश्‍चित करा अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली. 

वैभव नाईक यांचे निर्देश 
शहरातील सर्व्हिस रोडचे काम गेली तीन वर्षे रेंगाळले आहे. महामार्ग अधिकाऱ्यांनी आता कोणतीही कारणे न देता मिसिंग प्लॉटच्या भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत. येत्या आठ दिवसांत कणकवली शहरातील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करा असे निर्देश आमदार वैभव नाईक यांनी या बैठकीत हायवे अधिकाऱ्यांना दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com