कोकणातील युतीचा तिढा सोडविण्यासाठी उद्या मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

रत्नागिरी - जालना पाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप तिढा वाढत आहे. भाजपने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना कडाडून विरोध केला आहे. कोकणसह आजूबाजूच्या सहा मतदारसंघातील युतीच्या पदाधिकार्‍यांची मुंबईत नेरुळ येथे उद्या (ता. 18) बैठक होत आहे.

रत्नागिरी - जालना पाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप तिढा वाढत आहे. भाजपने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना कडाडून विरोध केला आहे. कोकणसह आजूबाजूच्या सहा मतदारसंघातील युतीच्या पदाधिकार्‍यांची मुंबईत नेरुळ येथे उद्या (ता. 18) बैठक होत आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. त्यात युतीचे मनोमिलन होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना-भाजप युती झाली असली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ती अजुनही कागदावरच आहे. गेल्या साडेचार वर्षात शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडून युतीचे खासदार असूनही भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. त्याचा राग काढण्यासाठी भाजप नेते सरसावले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा प्रचार करणार नाही अशीच भुमिका घेतली होती. त्या भुमिकेवर अजूनही भाजप कार्यकर्ते ठाम असून दिवसेंदिवस त्या वाढ होत आहे. हा तिढा सोडविण्यासाठी 15 मार्चला मुंबईत बैठक होणार होती.

शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई तर भाजपकडून बंदर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार होते. याबाबत पालीतील सभेत खासदार विनायक राऊत यांनी दुजोरा दिला होता.  परंतु ती बैठक लांबणीवर गेली. ती उद्या होण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेकडून मतदारसंघात जोरदार प्रचार-प्रसार सुरु आहे. तळागाळात शिवसेना रुजली असली तरीही विरोधात स्वाभिमानचे निलेश राणे असल्यामुळे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत मित्रपक्ष भाजपचा हात शिवसेनेच्या विजयासाठी अत्यावश्यक आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे बैठक घेण्याचा हट्ट धरला आहे. यामध्ये शिवसेनेची कोंडी झाली असून ती फोडण्यासाठी मुख्यमंत्रीच उपयुक्त ठरणार आहेत.

भाजपकडून विनायक राऊत यांच्याऐवजी सुरेश प्रभु यांचे नाव पुढे केले जात आहे. प्रभु यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही जोमाने प्रचार करु असे सांगितले जात आहे. हा मतदारसंघ पुर्वीपासून शिवसेनेकडे आहे. 

वैयक्तिक भेटीचं काय?

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट मागितली होती; मात्र अद्यापही तसे नियोजन झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीनंतर मनोमिलन होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in Mumbai tomorrow to combat the alliance in Konkan