सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर स्थायी सभेत ओढले ताशेरे

विनोद दळवी 
Saturday, 19 September 2020

सुविधा व औषधे अभावी जिल्ह्यातील रुग्ण बळी पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीचे कोरोनामुळे झालेले निधन याच कारणामुळे झाले आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोना रुग्ण व कोरोना मृत्यू वाढत असताना जिल्हा रुग्णालयाची स्थिती गंभीर आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. झोपायला चादरी नाहीत. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. इंजेक्‍शन, गोळ्या पुरेशा नाहीत. त्यामुळे कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रूग्णालय गंभीर नाही, हे स्पष्ट होते. जिल्हा नियोजनला मंजूर निधीतील 50 टक्के निधी कोरोनासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी वळविला आहे. तरीही ही अवस्था अशी कशी? असा प्रश्‍न स्थायी समिती सभेत रणजीत देसाई यांनी केला. केवळ आढावा बैठका घेवून व पत्रकार परिषदा घेवून कोरोना जाणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

कोरोनामुळे होणारे बळी याचेच कारण असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यावेळी शिवसेना सदस्य संजय पडते यांना याकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधण्याचे आवाहन सभागृहाने केले. स्थायी समितीची तहकूब सभा आज ऑनलाईन झाली. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती रविंद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, रणजीत देसाई, संजना सावंत, संजय पडते, संतोष साटविलकर, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत सभागृहाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले. सुविधा व औषधे अभावी जिल्ह्यातील रुग्ण बळी पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीचे कोरोनामुळे झालेले निधन याच कारणामुळे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर वाढला आहे, असा आरोप संजना सावंत यांनी केला. जिल्ह्यात व्हेंटीलेटरसह विधानसभा मतदारसंघनिहाय कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी केली. 

जनता दरबार घ्यायला सांगा 
जिल्हा परिषदेत अनेक अधिकारी पदे रिक्त असताना तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत बोलताना साटविलकर यांनी पालकमंत्र्यांकडे याबाबत पडते यांनी कळवावे. एकतर बदली केलेल्या ठिकाणी अधिकारी द्यावा. अन्यथा येथून अधिकारी सोडणार नाही, असे सांगितले. यावर बोलताना रणजीत देसाई यानी पालकमंत्र्यांना याबाबत जिल्हा परिषदेत दरबार भरवायला सांगावे. जिल्हा परिषदेच्या सर्व समस्या त्यांना समजतील, असे सांगितले. 

जनसुविधा यादीवरून खडाजंगी 
जनसुविधा कामांच्या आराखड्या बाहेरील कामांना मंजूरी दिल्याचा आरोप रणजीत देसाई यांनी केला. त्यामुळे आम्ही या यादिला मान्यता देणार नसल्याचे सांगितले. शाळा दुरुस्ती कामे मंजूर करताना जिल्हा परिषदेने जाणून बुजुन विरोध सदस्यांची कामे डावलली असा आरोप संजय पडते यांनी केला. यामुळे जोरदार खडाजंगी झाली.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Sindhudurg Standing Committee