म्हाडा अध्यक्षांचा कंत्राटदाराला दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

रत्नागिरी - म्हाडाने उभारलेल्या वसाहतींमधील घरांची सोडत होऊन सहा महिने झाले. तरीही त्या मालकांना घरे ताब्यात न देणाऱ्या लोढा कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.

रत्नागिरी - म्हाडाने उभारलेल्या वसाहतींमधील घरांची सोडत होऊन सहा महिने झाले. तरीही त्या मालकांना घरे ताब्यात न देणाऱ्या लोढा कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. म्हाडा अध्यक्षपदाचा पदभार घेऊन सामंत यांना आठवडा झाला आहे. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबईसह पालघर, ठाणे, कल्याण-डोंबवली भागांत म्हाडाने उभारलेल्या वसाहतीमधील काही घरांची लॉटरी प्रक्रिया झालेली आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेले असताना ठेकेदार त्यांना आतमध्येही जाऊ देत नाही. याबाबत त्यांच्याकडे तक्रार आली होती. त्याची दखल घेऊन त्या कंत्राटदाराला सामंत यांनी कारणे दाखवा नोटीस दिली.

मुंबईसह परिसरात म्हाडाच्या अनेक जमिनी आहेत; मात्र त्याचे रेकॉर्ड नाही. काही जमिनींवर अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘दोन हजार घरांची लॉटरी सोडत येत्या दिवाळीपूर्वी जाहीर करणार आहे. म्हाडाचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्याला जाणार नाहीत. तांत्रिक समितीमधील अधिकारीच हे दौरे करतील आणि त्यांचा अहवाल तीन महिन्यांत सादर करतील. कमीत कमी किमतीत घर उभारण्यासाठी चेन्नई पॅटर्न राबविण्याचा विचार आहे. त्यासाठी अधिकारी तिकडे गेले आहेत. त्यावर अभ्यास सुरू आहे.’

रत्नागिरी, चिपळुणात वसाहत
चिपळुणातील म्हाडाच्या जागेचा प्रश्‍न येत्या काही दिवसांत सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरीत जागा मिळाल्यास नवीन म्हाडाची वसाहत बांधू. पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधणीचा प्रकल्प राबविण्याचा मानस आमदार सामंत यांनी व्यक्त केला.

Web Title: MHADA Colony issue