कोकणातील प्रत्येक गिरणी कामगाराला घर देणार 

कोकणातील प्रत्येक गिरणी कामगाराला घर देणार 

कुडाळ - सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील प्रत्येक गिरणी कामगारांना घर मिळवून देण्यासाठी माझा शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न राहील. म्हाडाची घर देण्याची प्रक्रिया पारदर्शक ऑनलाईन असल्याने दलालापासून सावध राहा, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज गिरणी कामगार मेळाव्यात केले. पहिल्या टप्प्यात 5090 घरांची लॉटरी पद्धतीने सोडत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

म्हाडा मार्फत गिरणी कामगारांना सोडत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या घरांचा लाभ जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या गिरणी कामगारांना मिळावा तसेच याबाबतची सर्व माहिती गिरणी कामगारांना व्हावी, यासाठी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार वैभव नाईक, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगारांचा मेळावा झाला.

यावेळी नूतन जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, अतुल बंगे, हरी खोबरेकर, मंगेश लोके, जयभारत पालव, राजन नाईक, संजय भोगटे, राजू गवंडे, भाई चव्हाण, सचिन वालावलकर, म्हाडाचे अधिकारी सुभाष माळी, किरण कासले, रवींद्र कुबडे, संजय पेडणेकर, हेमंत पाटील, श्रीकांत म्हचा, अमर मारिया आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, ""राज्याच्या कानाकोपऱ्यातील गिरणी कामगारांना जागेच्या उपलब्धतेनुसार घरे दिली जाणार आहेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गिरणी कामगारांना घरे मिळावीत, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. माझी कर्मभूमी जरी रत्नागिरी जिल्हा असली तरी जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून मी आलेलो नाही तर माझ्या प्रत्येक गिरणी कामगाराला न्याय मिळावा, यासाठी मी कार्यरत राहणार आहे. याच अनुषंगाने पहिल्या टप्प्यात 5090 घरांची लॉटरी निघणार आहे. यामध्ये लॉटरीत ज्याचे नशीब लागेल तो लकी ठरणार आहे. लॉटरी पद्धत ही पूर्णपणे पारदर्शक असून यामध्ये दलाल नाही. तुम्हाला कोणत्याही दलालाने त्रास दिला असेल तर त्याची तक्रार अधिकारी यांच्याकडे करा. त्यांना तत्काळ जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. आपल्याला 1 लाख 74 हजार 218 घरे द्यायची आहेत; मात्र ज्या गिरणी कामगारांनी अर्ज दाखल करताना डबल फॉर्म झाल्यामुळे ज्या काही त्रुटी आहेत त्या स्वतःहून गिरणी कामगारांनी म्हाडाकडे येऊन सोडवाव्यात. आचारसंहितेपूर्वी 25 हजार घरे देण्यासाठी म्हाडा सज्ज झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची जागा तसेच कांजूरमार्ग मुंबई शहर व उपनगरातील जागा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'' खासदार राऊत व आमदार नाईक यांच्या पुढाकाराने हा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरीत दोन हजार घरांसाठी जागा बघण्याचा संकल्प केला आहे. तशाच प्रकारे सिंधुदुर्गात एक हजार घरे बांधण्यासाठी जागा लागेल त्या जागेसाठी आमदार नाईक यांनी पुढाकार घ्यावा. डिसेंबरमध्ये प्रत्येकाला घराची चावी देण्याचा प्रयत्न केला जाईल.'' 

खासदार राऊत म्हणाले, ""कोकणातील गिरणी कामगारांसाठी पंचवीस हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे. गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवा. पाच टक्के राखीव त्यांच्यासाठी ठेवण्यात यावे.'' 

आमदार नाईक म्हणाले, ""गिरणी बांधवांना हक्काचे घर मिळाले पाहिजे ही काळाची गरज आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. गिरणी कामगारांना निश्‍चितच न्याय मिळेल.'' 
या बैठकीत गिरणी कामगार घरांच्या सोडती संदर्भात सर्व माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लॉटरीसाठी अर्ज कसे दाखल करावेत, आपले नाव कसे शोधावे, कोणत्या संकेतस्थळावर लॉटरीसाठी अर्ज करावे, कोण लाभार्थी होऊ शकतात, कागदपत्रांबाबत लोकांच्या असलेल्या त्रुटी, शंका याची सविस्तर माहिती देण्यात आली. 

नाईक, सामंत मंत्री असतील 
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांपासून सर्वांमध्ये आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली, सर्वाधिक विकासकामे केली असे आमदार वैभव नाईक व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हे उद्याचे युतीचे मंत्री असणार आहेत, असे संकेत खासदार राऊत यांनी दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com