दूध उत्पादन वाढीसाठीची कामधेनू योजना विस्मृतीत

- नंदकुमार आयरे
बुधवार, 25 जानेवारी 2017

कोट्यवधीचा निधी असूनही गांभीर्य नाही - जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये योजना राबविण्याचे होते नियोजन

सिंधुदुर्गनगरी - दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने कामधेनू ही योजना राज्यात अमलात आणली. त्यासाठी २०१२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यवधीचा निधीही मंजूर झाला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये ही योजना राबविण्याचे नियोजनही झाले; मात्र या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने ही योजनाच विस्मृतीत गेल्याचे दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा दुग्ध व्यवसायासाठी पूरक असा जिल्हा आहे. येथे उपलब्ध असलेले पाणी आणि पोषक वातावरणाचा फायदा घेऊन येथील दुग्ध व्यवसायात मोठी वाढ होऊ शकते. दुधाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने २०१० मध्ये कामधेनू योजनेची राज्यात अंमलबजावणी केली. यासाठी जिल्ह्याला १ कोटी ७७ लाखांचा निधी २०१२ मध्ये मंजूर झाला होता. याच्या माध्यमातून जिल्ह्यातील २१ गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार किमान ३०० जनावरे असलेल्या गावांचाच या योजनेत समावेश केला जात होता. हा निकष बदलून इतरही गावांमध्ये ही योजना राबविली जावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने त्या वेळी शासनाकडे केली होती. याला शासनाने मान्यताही दिली होती. त्यानुसार शासनाने १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्धही करून दिला होता.

कामधेनू योजना राबविण्यासाठी निश्‍चित केलेल्या गावांमध्ये समित्या स्थापन करून त्याच्या माध्यमातून ही योजना राबविण्याबाबत व निधी खर्च करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. जनावरे खरेदी करणे, संगोपन करणे, खाद्य पुरविणे, दूध विक्री करणे यांसह आवश्‍यक ते प्रशिक्षण देणे आदी बाबी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या होत्या; मात्र कामधेनू या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीबाबत किंवा सद्यःस्थितीबाबत कोणतेही विषय चर्चेला येत नाहीत किंवा आढावाही घेतलेला नाही. त्यामुळे शासनाची कामधेनूसारखी महत्त्वाकांक्षी योजना सध्या विस्मृतीत गेली आहे.

...तर दूध उत्पादनात होईल वाढ
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुधनात वाढ आणि दुग्ध उत्पादनात दुपटीने वाढ होऊ शकते; मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. या योजनेच्या माध्यमातून निवड केलेल्या पहिल्या टप्प्यातील २५ गावे व दुसऱ्या टप्प्यातील ५२ गावे अशा ७७ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविल्यास जिल्ह्यात (दुधाचा महापूर) दूध उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे; मात्र योजनेकडे पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही.

Web Title: mild production increase kamdhenu scheme