कोरोनामुळे कोकणात जत्रोत्सवातील मथुरेचे बाजार शांत ; लाखोंची उलाढाल ठप्प

सचिन माळी
बुधवार, 8 एप्रिल 2020

जत्रोत्सवातून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.
 वसंत ऋतूची चाहुल लागताच गावखेड्यात जत्रा आणि यात्रा सुरू होतात. ग्रामदेवतेच्या या जत्रा आणि यात्रा म्हणजे ग्रामीण जनतेचे जणू सुखनिधान! महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत जत्रा आणि यात्रा यांना महत्त्वाचे स्थान आहे

मंडणगड - कोकणात चैत्र महिन्यात अनेक गावांतून भरणाऱ्या वार्षिक जत्रेत तमाशाच्या माध्यमातून गण, गौळण, कृष्ण, सुदामा, मावशी अशी पात्र अवतरून कलात्मक मथुरेचा बाजार भरवला जातो. शक्ती तुरा डबल बारी प्रश्नोत्तरी सामन्यांना रंग चढतो. मात्र कोरोना महारोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने शासनाने सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली असून संचार व जमाव बंदी केली आहे. यामुळे ३ एप्रिल पासून सुरू होणारे मंडणगड तालुक्यातील धुत्रोली, शेडवई, घराडी, तुळशी, बोरघर, माहू, वाकवली तसेच कोकणातील अनेक तालुक्यातील वार्षिक जत्रोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका कलगी तुरा तमाशा ही लोककला जोपासणारे शाहिर व कला पथकांना बसला असून कलेच्या माध्यमातून भरविण्यात येणारे मथुरेचे बाजार शांत झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

या जत्रोत्सवातून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.
 वसंत ऋतूची चाहुल लागताच गावखेड्यात जत्रा आणि यात्रा सुरू होतात. ग्रामदेवतेच्या या जत्रा आणि यात्रा म्हणजे ग्रामीण जनतेचे जणू सुखनिधान! महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत जत्रा आणि यात्रा यांना महत्त्वाचे स्थान आहे. या ग्रामोत्सवांमध्ये केवळ लेझीमच चालत नाहीत, तर हलगी आणि ढोलकीही कडाडते. शाहिरांचा गायनाने परिसर दुमदुमतो. रात्रभर तमाशा रंगतो. पूर्वापार चालत आलेली तमाशा ही पारंपरिक लोककला तालुक्यातील अनेक शाहिरांनी आजही जपली असून त्याला वेगळा साज, रंग चढवला आहे. तमाशा ही महाराष्ट्राची अतिशय लोकप्रिय लोककला असून महाराष्ट्रातील लोककलांची ओळखच तमाशाद्वारे झालेली आहे. तमाशा ही जरी निखळ रंजनपर लोककला असली, तरी तमाशाचे मूळ हे कलगी-तुऱ्याच्या आध्यात्मिक शाहिरीमध्ये दिसते. तसेच या दरम्यान पूजा अर्चा लोटांगणे, गाऱ्हाणी, पालखी मिरवणूक, देवाच्या भेटीगाठी असे धार्मीक कार्यक्रम होतात. तसेच करमणूकीचे कार्यक्रमात दशवतारी नाटके, भारूडे, लोककला तमाशा, वारकरी कीर्तन, भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन प्रामुख्याने केले जाते. यामुळे स्थानीक कलाकरांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होते. रोजगार अभाव असलेल्या जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांवर जत्रा या रोजगाराचे साधनही बनल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत असल्याने त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा जसे, हॉटल, मिठाई, लहान मुलांची खेळणी, सौदर्य प्रसाधने यांची रेलचेल अशा ठिकाणी असल्याने यातून अनेकांना रोजगार मिळतो. मंडणगड तालुक्यात धुत्रोली, तुळशी, बोरघर, माहु, शेडवई, घराडी, मुगीज, केळवत, लाटवण, वाकवली, पालवणी, पेवेकोंड या गावांतून हनुमान जयंतीचे औचित्य साधून वार्षिक जत्रा भरवल्या जातात. त्यानिमित्ताने मनोरंजनासाठी शक्ती तुरा लोककला तमाशा आवर्जून ठेवला जातो. तरुण पिढीची आवड बदलती असल्याने काही ठिकाणी नाटक, नृत्यविष्काराचे कार्यक्रम होतात. मात्र जत्रेची तमाशा ही ओळख असल्याने अजूनही शक्ती तुऱ्याच्या कार्यक्रमाला पसंती दिली जाते. डबल बारी असणाऱ्या या कार्यक्रमांसाठी प्रत्येक तमाशा संचाची १५ ते २० हजारांची सुपारी असते. तालुक्यातील अनेक नामवंत शाहीर आपली कला तमाशातून सादर करीत स्वरचित गीतांद्वारे लोकप्रबोधन करतात. फक्त मंडणगड नाही तर म्हसळा, महाड, दापोली, माणगाव अशा तालुक्यातही यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होते. पौराणिक ग्रंथ, धार्मिक पुस्तके यासह विज्ञानावर आधारित प्रश्न एकमेकांना जाहीरपणे विचारून बौद्धिकतेची कसोटी पहिली जाते. धुत्रोली हनुमानवाडीची मोठी जत्रा भरते. या जत्रेला रेकोर्ड ब्रेक गर्दी असते. विविध प्रकारची दुकानांची रांग, कल्पकतेने मांडलेले खेळ यामुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत हौसे, नौसे सर्वजण जत्रांना गर्दी करतात. मुख्य म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी प्रमुख बाजारपेठ या जत्रांमुळे उपलब्ध होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे या सर्वांला तालुकावासीय मुकणार असून लाखोंची होणारी आर्थिक उलाढाल थांबणार आहे. तर जत्रेच्या उत्पन्नावर अवलंब असणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

बैलगाडीतून, मशाली घेऊन पारावर सादर होणारा तमाशा आता अत्याधुनिक प्रकाशयोजना, ध्वनी संयोजनासहित सादर केला जातो. शास्त्रीय पदे, कटाव, लावणी, धावता गण, माया-ब्रम्ह अशा वादविवाद प्रकारात सादर केला जातो. मात्र कोरोनामुळे जत्रोत्सव रद्द झाल्याने घेतलेल्या तमाशा बारीच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या आहेत. त्याची मोठी झळ तालुक्यातील सांस्कृतिक वाटचालीला बसली आहे.

- शाहीर तुकाराम माळी, महाराष्ट्र गौरव भूषण

परस्पर सहकार्याची तत्व अंगीकारून ग्रामीण एकजुटीचा संदेश या जत्रेतून देण्यात येतो. सांस्कृतिक लोकजीवन व समृद्ध परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी जत्रोत्सवातील विविध उपक्रम उपयोगी ठरतात.

- समीर पारधी, तुळशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of turnovers stop kokon corona virus