esakal | आश्वासन देवूनही तुटपुंजी भरपाई; कळणेग्रस्तांची गुराढोरांसह धडक | Agitation
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

आश्वासन देवूनही तुटपुंजी भरपाई; कळणेग्रस्तांची गुराढोरांसह धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- रोहन गावडे

सावंतवाडी - कळणे खनिज प्रकल्प दुर्घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० टक्के भरपाई देतो असे सांगून केवळ तुटपुंजी भरपाई देण्यात आल्याने प्रशासनाविरोधात आज कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला मनसेचे नेते परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

कळणे येथील मायनिंग प्रकल्पाचा बांध फुटून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला; मात्र तीन महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही भरपाई देण्यात आली नाही. ही भरपाई मिळण्यासाठी या अगोदर देखील आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र प्रशासनाकडून ५० टक्के भरपाई देण्यात य़ेईल असे सांगण्यात आल्याने उपोषण स्थगित केले होते.

हेही वाचा: राजीनामा द्या, मगच बोला; भाजपच्या 3 सदस्यांना शिवसेनेचे आव्हान

दोन दिवसात ५० टक्के भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला होता; मात्र पंचानाम्यातील नुकसानीनुसार तुटपुंजी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत संबंधित प्रशासनाने त्यांची खिल्ली उडवली. यामुळे संतप्त झालेल्या कळणेवासियांनी आज येथील प्रांत कार्यालयासमोर आपल्या गुरा-ढोरांना घेऊन उपोषण छेडले आहे. यावेळी शासनाने दिलेल्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई देणे, बंद करा बंद करा, कळणे मायनींग बंद करा, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण करा, नायतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सरपंच प्रिया नाईक, कुंब्रल सरपंच प्रविण परब, अरुण देसाई, मिलिंद नाईक, प्रकाश परब, अभय देसाई, मानसी देसाई, चंद्रकांत परब, जयसिंग देसाई, वैशाली देसाई, आदी कळणेतील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान मायनिंग अधिकारी अजित पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, दोडामार्ग तहसिलदार अरुण खानोलकर यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

loading image
go to top