#KonkanRains सिंधुदुर्गासाठी दोन कोटींचा पूरनिधी मंजूर

#KonkanRains सिंधुदुर्गासाठी दोन कोटींचा पूरनिधी मंजूर

कुडाळ - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर दोन कोटींचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. महसूल, वीज, बांधकाम विभागाने युद्धपातळीवर ज्या ठिकाणी समस्या उद्‌भवल्या, त्या तत्काळ दूर करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला दिले. 

जिल्ह्यात ४९३ कुटुंबांतील दोन हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना तत्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ज्या लोकांची या पुरात घरे वाहून गेली, त्यांना मंगळवारपर्यंत मदत मिळालीच पाहिजे, या दृष्टीने प्रशासन यंत्रणा कार्यरत झाली पाहिजे. सर्व स्तरापर्यंत मदत पोचवा. ज्या ठिकाणी यंत्रणा कोलमडली आहे, त्या ठिकाणी तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून गोव्याच्या धर्तीवर मोठी बोट उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून, त्या दृष्टिकोनातून या उपाययोजनेसाठी तत्काळ यंत्रणा उभी करण्याचे आदेशही दिले. सिंधुदुर्गात गेले सहा दिवस मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. विशेषतः दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ले तालुक्‍यात कित्येक लोकांना आपत्तीला सामोरे जावे लागले. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री केसरकर, खासदार राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी विश्रामगृहावर विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 

या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, महावितरण अधीक्षक अभियंता पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, अतुल बंगे, जान्हवी सावंत, उपसभापती श्रेया परब, मंदार शिरसाठ, सचिन काळप, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव, डॉ. धनंजय चाकूरकर, श्रीमती साठे, प्रांत डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, रूपेश राऊळ, अशोक दळवी, सुशील चिंदरकर, सुकन्या नरसुले, आबा कोंडस्कर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गसाठी दोन कोटींचा पूरग्रस्त निधी मंजूर झाला असून, त्याचे वाटप येत्या मंगळवार (ता. १३)पर्यंत सर्वत्र झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंधुदुर्गात यंदा दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर भूवैज्ञानिकांची मदत घेऊन त्याचे कारण शोधून उपायोजना करण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून गोव्याच्या धर्तीवर याठिकाणी मोठ्या बोटी देता येतील. त्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.

आरोग्याबाबतीत आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. जिल्ह्यात १३ पोलिस ठाण्यांच्या ठिकाणी बोटी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात कोलमडली आहे, त्या ठिकाणी आवश्‍यक ती कार्यवाही करावी.’’ दरम्यान, पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्‍यात उद्‌भवलेल्या अनेक समस्यांबाबत गोवा सरकारने चांगले सहकार्य केले. त्यांचे या वेळी श्री. केसरकर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी
खासदार राऊत म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्रात आपत्ती जाहीर केली, तशाच प्रकारची आपत्ती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना करणार आहे. दुधाचा तुटवडा लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दूध भुकटीचे तालुकानिहाय वाटप करण्याचा उपक्रम उद्यापासून केला जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com