धनगर समाजासाठी हजार कोटींची तरतूद - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

वैभववाडी - धनगर समाजाचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज केले. 

वैभववाडी - धनगर समाजाचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज केले. 

एडगाव-वायबोंशी येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत सभापती लक्ष्मण रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, सज्जन रावराणे, सरपंच राजेंद्र सुतार, उपसरपंच रुक्‍मिणी शेळके, गंगाराम अडुळकर, हेमंत पवार, संतोष बोडके, सूर्यकांत बोडके आदी होते.

श्री. जानकर म्हणाले, ""धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सरकार देखील त्यासाठी सकारात्मक पावले उचलित आहे; मात्र आरक्षणामुळे समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून धनगर समाजातील लोकांना दहा लाख घरकुल देण्यात येणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतेचा वसा घेऊन आम्ही काम करीत आहोत. आपले सरकार कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. या भागाचा विकास व्हावा, अशी आपली प्रबळ इच्छा आहे. काजू प्रकल्पासाठी 100 कोटी मंजूर आहेत. येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर टुरिझम सुरू करण्यात येणार आहे.'' 

श्री. जानकर यांचे एडगाव-वायबोंशी येथील धनगर बांधवांनी गजनृत्य सादर करीत स्वागत केले. तालुका धनगर समाजातर्फे देखील त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. 

एडगाव-वायबोंशी रस्त्यासाठी निधी 
एडगाव-वायबोंशी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री जानकर यांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Mahadev Jankar comment