सूर्यकांत दळवींना रामदास कदम यांची कावीळ

सूर्यकांत दळवींना रामदास कदम यांची कावीळ

दाभोळ -  दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींना रामदास कदम यांची कावीळ झाली असून त्यांना आता सर्वत्र रामदास कदमच दिसू लागले आहेत, अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली तसेच ते म्हणाले,  दळवी यांनी आपली केवळ बदनामी करण्यासाठीच आपण जादूटोणा करत असल्याचा आरोप केला असून आपण सूर्यकांत दळवी यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहोत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्‌टी करण्यात यावी, अशी मागणीही पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दोन दिवसांपूर्वी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात व जादूटोणा करत असल्याचा धक्‍कादायक आरोप केला होता. मंगळवारी (ता. १०) दापोली तालुका शिवसेना कार्यालयाचे उद्‌घाटन समारंभासाठी आले असता, रामदास कदम यांचेशी पत्रकारांनी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, मी विरोधी पक्षनेता असतानाच राज्यात जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झाले होते. हे दळवी यांना माहिती नाही का? आपल्या विरोधात काहीतरी वक्‍तव्य करून चर्चेत राहण्यासाठी दळवी यांचा हा खटाटोप आहे. दापोलीत शिवरायांच्या पुतळ्यासाठी कुणी कुणी पैसे काढले व ते गेले कुठे हे शिवसैनिकांना माहिती आहे. येथील शिवसैनिकांच्या घामाच्या पैशातून शिवसेनेचे कार्यालय उभारण्यात आले होते. ते कोणी विकून खाल्ले, हे ही शिवसैनिक ओळखून आहेत.

१ हजार २०० कोटींचा निधी आणला
गेल्या २५ वर्षात आमदार असताना सूर्यकांत दळवी यांनी जेवढी विकास कामे केली नाहीत, तेवढी विकास कामे आपण मागील ४ वर्षात केली असून दापोली विधानसभा मतदारसंघात १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी आणला असून दळवी समोर आल्यास त्याचा आपण हिशेबही देऊ. 

विधानसभेचे तिकीट नाही तर एसटीचे
 तुमचे दिवस आता गेले आहेत, यापुढे तुम्हाला दापोली विधानसभेचे तिकीट नाही तर एसटीचे तिकीट काढून मुंबईत पोचविल्याशिवाय येथील शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असेही रामदास कदम यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com