चक्रीवादळाचा सामना करण्यास सज्ज ः सामंत

minister uday samant press conference konkan sindhudurg
minister uday samant press conference konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग)-  हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर 2 जूनला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ झालेच तर त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासाठी 21 बोटी उपलब्ध असून 22 व्यक्तींची एनडीआरएफची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सामंत यांनी जिल्हा प्रशासनासोबत चक्रीवादळ व पावसाळा पूर्व नियोजन बैठक जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात घेतली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदी उपस्थित होते. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, अतुल रावराणे उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, ""चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे 7 फायबर बोटी, 9 रबर बोटी, पोलिसांकडे 5 फायबर बोटी उपलब्ध असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच पावसाळी कालावधीत जिल्ह्यांची रस्ते स्थिती, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थिती याची माहिती आपण घेतली आहे. एमएसीबीचा आढावा घेतला महामार्गाचे जिल्ह्यातील काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. कणकवली ब्रीज 15 ऑक्‍टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणने दिले आहे.'' 

ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिलेल्या कोविड लॅबसाठी जिल्हा नियोजनमधून 61 लाख 33 हजार एवढा निधी मंजूर केला आहे. आज सायंकाळपर्यंत याचा अध्यादेश प्रशासनाला प्राप्त होईल. पुढील 4 ते 5 दिवसांत कोल्हापूर किंवा मुंबई येथून मशिनरी आणल्या जातील. याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतरच्या पुढील 8 ते 10 दिवसांत लॅब सुरू होईल. जिल्हा रुग्णालयात लॅबसाठी आवश्‍यक 50 टक्के यंत्रणा उपलब्ध आहे. केवळ 50 टक्के यंत्रणा उभारायची आहे. जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असलेला अधिकचा निधी सुद्धा दिला आहे, तसेच सावंतवाडी येथील मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व कुडाळ येथील महिला रुग्णालय याबाबत मंगळवारी खासदार राऊत यांच्या समवेत दौरा करून प्रश्‍न सोडविणार आहोत. अपूर्ण असलेल्या धरणांची पाहणी करणार आहे.'' 

"त्या' ड्यूटीबाबत चौकशी करणार 
जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयित व नंतर पॉझिटिव्ह झालेल्या त्या परिचारिकेला तिचा स्वब घेतल्यानंतर लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्यूटी दिल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. याबाबतमंत्री सामंत यांनी याबाबत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत सत्यता आढळल्यास कारवाई करू, असे या वेळी सांगितले. 

...तर "त्या' सरपंचावर कारवाई करणार 
कोरोना बाधित आढळलेल्या परिचारिकेच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार परिचारिकेच्या गावातील सरपंचांनी घेतल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पालकमंत्री सामंत यांनी एखाद्या कुटुंबाला अशाप्रकारे वाळीत टाकणे माणुसकीला धरून नाही. कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. असे कोण करत असेल ? तर त्याच्यावर कारवाई अटळ असते. शनिवारी रुग्णालयातील एक परिचारिका बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर या परिचारिकेवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी "त्या' सरपंचांनी ह्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना देणार असल्याचे सांगितले. 

गोव्यात जाणाऱ्यांची यादी तयार 
गोवा राज्यात नियमित जाणाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यादी तयार केली आहे. याबाबत यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी एकवेळ बोलणे झाले आहे. परंतु जिल्हावासियांना रोज गोवा राज्यात जावून यायचे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी 1 जून नंतर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com