
आठवडा बाजार बंद करावा. यापुढे कोणतेही कार्यक्रम परवानगी शिवाय घेतल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लोकांनी स्वतःच संचारबंदी अंमलात आणावी. यासाठी नागरिकांनी सहकार्य न केल्यास कायदेशीर संचारबंदी लागू करावी लागेल. मास्क न वापरल्यास 200 ऐवजी 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. आठवडा बाजार बंद करावा. यापुढे कोणतेही कार्यक्रम परवानगी शिवाय घेतल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील दालनातून घेतलेल्या या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याशी कोरोनाबाबत बैठक झाल्याचे सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
ते म्हणाले, ""बैठकीत काही निर्णय झाले. गर्दी होणारे कार्यक्रम पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घेऊ नये. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक व प्रांतांना पथक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पथक अचानक भेटी देऊन नियमांचे पालन झाले का, याबाबत पाहणी करणार आहे. नियमभंग दिसल्यास कारवाई होईल.''
ते म्हणाले, ""जिल्ह्यात सध्या 143 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 5.45 आहे. मृत्यू दर 2.7 एवढा आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 10 व्यक्तींचा शोध घेतला जात होता; मात्र आता 20 ते 25 संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. कॉलेज व शाळा सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आला आहेत. त्यामुळे याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. शाळा, कॉलेज सुरु करणे, आठवडा बाजार बंद ठेवणे, याबाबत दोन दिवसांत सबंधित व्यक्तीशी बैठक घेवून चर्चा करण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.''
विरोधकांना लगावला टोला
वीज बिल प्रश्नी 24 रोजी जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. याबाबत ते म्हणाले, ""आपण जिल्हाधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्याशी बोलण्यास सांगू. मी स्वतः सुद्धा बोलणार आहे. हा प्रश्न एका पक्षाचा नाही. पूर्ण जगात ही समस्या आहे. भाजपचे पदाधिकारी "मॅच्युअर्ड' असतील तर ते ऐकतील.''
आरोग्य निरोगी रहावे, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कडक निर्णय घेतले आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने करा. यापूर्वी प्रमाणेच आताही सहकार्य करा. जिल्ह्याचे आरोग्य तुमच्या हाती आहे.
- विनायक राऊत, खासदार
संपादन - राहुल पाटील