मिरकरवाडा बंधाऱ्याला भगदाड

रत्नागिरी - भाटीमिऱ्या येथील ढासळलेल्या बंधाऱ्याची पाहणी करताना ग्रामस्थ.
रत्नागिरी - भाटीमिऱ्या येथील ढासळलेल्या बंधाऱ्याची पाहणी करताना ग्रामस्थ.

जेटींमुळे पाण्याचा प्रवाह मिऱ्याकडे - पावसाळ्यात पाणी घुसण्याची भीती; कोट्यवधींचा खर्च पाण्यात
रत्नागिरी - मिरकरवाडा बंदराच्या नूतनीकरणाचा फटका मिऱ्यावासीयांना बसण्यास सुरवात झाली आहे. पौर्णिमेच्या उधाणात नऊ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मजबूत बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात बंधारा ओलांडून पाणी मिऱ्या गावात घुसण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्‍त केली जात आहे. बंदरामध्ये बांधलेल्या जे टाईप आणि टी टाईप जेटींमुळे पाण्याचे प्रवाह मिऱ्याकडे वळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

पौर्णिमेचे उधाण गेले तीन ते चार दिवस सुरू आहे. पाण्याला करंट असून त्या लाटांनी भाटीमिऱ्या येथील बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. दोनच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला बंधारा ढासळू लागला आहे.

कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. आज ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याची पाहणी केली. भविष्यात यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या यावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रताप भाटकर, मारुती आंब्रे, सतीश कांबळे, महेंद्र शिवलकर, सुभाष कांबळे, राजेंद्र भाटकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. बंधाऱ्याचे दगड समुद्राच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले आहे. ढासळलेल्या दगडांमुळे ही परिस्थिती आणखीन बिकट होईल, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. गेल्यावर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाने मिऱ्यावासीयांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या; परंतु बंधाऱ्याजवळ टेट्रापॉड टाकून सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मिरकरवाडा बंदर येथील ब्रेकवॉटरची अतिरिक्‍त वाढलेली १५० मीटरची भिंत, पांढरा समुद्र येथे झालेला ४५० मीटरचा टी आकाराचा बंधारा आणि जाकिमिऱ्या येथे सुरू असलेल जीओ टेक्‍नॉलॉजिकल वापरून रिफ प्रोजक्‍ट राबविण्यात आला आहे. ही कामे किनाऱ्याच्या दोन्ही टोकाला सुरू आहेत. त्यामध्ये भाटिमिऱ्या गाव वसलेले आहे. येथे ११५० मीटरचा सागरी धूपप्रतिबंधक बंधारा उभारलेला आहे. या बंधाऱ्यामुळे शेकडो ग्रामस्थांचे संसार सुरक्षित आहेत. मिरकरवाडा टप्पा २ मधील कामांमुळे समुद्राचे प्रवाह बदलले. समुद्राचे पाणी गावात घुसण्याची शक्‍यता आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत उधाणाचे पाणी किनाऱ्याला लागून राहते. ओहोटीलाही आतमध्ये जात नाही. ही धोक्‍याची घंटा आहे. पौर्णिमेच्या उधाणावेळी पाणी बंधारा ओलांडून आतमध्ये घुसले होते. पावसाळ्यात यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. याविषयी मागील महिन्यात एका पत्राद्वारे सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर अद्यापही योग्य निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्‍त केला.

‘‘विकास ग्रामस्थांच्या जीवावर उठणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. मिरकवाडा टप्पा २ च्या कामाविषयी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती; परंतु त्यांच्याकडून पाहणी करू असे उत्तर दिले गेले. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.’’
- महेंद्र शिवलकर, ग्रामस्थ, मिऱ्या

‘‘मिरकरवाडा बंदरात टी टाईपची नवीन जेटी बांधली होती. त्यांची लांबी आणखी वाढवली आहे. बंदराच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या मशिदीजवळील संरक्षक भिंत जे टाईप बनविण्यासाठी दीडशे मीटर समुद्रात बांधली गेली. त्यामुळे प्रवाह वळले आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.’’
- प्रताप भाटकर, ग्रामस्थ, मिऱ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com