शिवसेना, भाजपच्या साठमारीत कोकणचा बट्ट्याबोळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

वेंगुर्ले - राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात चांगले वातावरण असून लोकांना आता बदल हवा आहे. विधानसभेत देशात, राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी कोकणात मात्र कुठेही नाही. शिवसेना व भाजपच्या राजकीय साठमारीमध्ये कोकणचा बट्ट्याबोळ झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक भास्कर जाधव यांनी येथे केली.

वेंगुर्ले - राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात चांगले वातावरण असून लोकांना आता बदल हवा आहे. विधानसभेत देशात, राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी कोकणात मात्र कुठेही नाही. शिवसेना व भाजपच्या राजकीय साठमारीमध्ये कोकणचा बट्ट्याबोळ झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक भास्कर जाधव यांनी येथे केली.

जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज कॅम्प येथील महिला काथ्या कारखान्याच्या कार्यालयात झाल्या.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. जाधव म्हणाले, ""जनतेला आता निष्क्रिय व घोषणांचा पाऊस पडणारे सरकार नको. प्रत्यक्ष कृती करणारे व शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनामध्ये नवीन बदल घडवणारे सरकार पाहिजे. कोकणात भाजप कुठेही नसून याठिकाणी शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जरी शिवसेना भाजप युतीमध्ये असले तरीही गेल्या पाच वर्षात कोकणातील सेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी शिवसेनेची कोंडी केली आहे. यामुळे विकास कामे ठप्प आहेत. ती कोंडी मोडण्याचे कौशल्यही शिवसेनेकडे नाही. या दोघांच्या भांडणाशी जनतेचे काही देणेघेणे नसून यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीलाच जनता साथ देईल.''

यावेळी अर्चना घारे - परब, एम. के. गावडे, सुरेश गवस, प्रदेश उपाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, रत्नागिरी जिल्हा बॅंक संचालक श्री. सुर्वे, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सरोज परब, शिवाजी घोगळे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर उपस्थित होते.

उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार गावडे यांनी शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची नावे आचारसंहिता लागण्यापूर्वी एक महिना अगोदर जाहीर व्हावीत, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.

हे आहेत इच्छुक उमेदवार
यावेळी श्री. जाधव आणि सौ. घारे-परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रांतिक सदस्य एम. के. गावडे तर कणकवली विधानसभा मतदार संघासाठी अभिनंदन मालणकर यांच्या मुलाखती घेतल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhaskar Jadhav Comment