सरकार नक्की आहे तरी कोणाचे...? डॅा. नातूंनी केला असा सवाल अन्....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये आणलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांवरून उद्योजकांवर गुन्हे दाखल होतात. दडपशाहीचा वापर करून अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते

गुहागर( रत्नागिरी): राज्याचे उद्योगमंत्री उद्योग सुरू करण्याकरिता कॉन्फरन्स बैठका घेतात; मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये आणलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांवरून उद्योजकांवर गुन्हे दाखल होतात. दडपशाहीचा वापर करून अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते. सत्ताधारी लोकप्रतिनिधीच निर्णयाविरोधात निवेदने देत आहेत, असा गजब कारभार सुरू असल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नातूंनी केला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चाललेल्या शासनाच्या कारभाराचा डॉ. विनय नातूंनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री मिशन बिगीन अगेनची घोषणा करत पुनश्‍च हरिओम्‌चा नारा देतात. त्याचवेळी पर्यावरण मंत्री, परिवहन मंत्री, उच्च तंत्र शिक्षणमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून जिल्हा लॉकडाउन करतात. उद्योगमंत्री राज्यातील उद्योग सुरू होण्यासाठी कॉन्फरन्स बैठका घेतात. मात्र, जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी आलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांमुळे उद्योजकांवर गुन्हे दाखल होतात.

हेही वाचा- शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली : 74 हजार शिक्षकांना मिळणार आता ऑनलाईन प्रशिक्षण -

जिल्ह्यातील कारभाराचा आमदार डॉ. नातूंकडून असा पंचनामा.....

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धाड टाकून अवैध मद्यसाठा जप्त करतात, म्हणून त्यांना सक्तीची रजा घेण्यास सांगितले जाते. जिल्हा शल्यचिकित्सकाला कोविड चाचणी प्रयोगशाळा उद्‌घाटनाला बोलावले जात नाही. एका मृतदेहाच्या चौकशीसाठी सक्तीची रजा घेण्यास भाग पाडले जाते; मात्र आरोप झाल्यावर शल्यचिकित्सक स्वखुशीचे कारण सांगतात. गुहागर तालुक्‍यात कोरोना रुग्ण मिळत नाहीत, म्हणून तालुका प्रशासनाकडे शंकेखोर वृत्तीने पाहिले जाते, अशी उदाहरणे नातू यांनी दिली. 

हेही वाचा- राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूरला आला अन्.... -

शेजारील सिंधुदुर्गकडे बघा 
आपल्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपती सणाचे नियोजन, नियमावली व उपाययोजनांची अंमलबजावणी याकरिता बैठका व निर्णय होत आहेत तर रत्नागिरी जिल्हा पुरवणी आदेश क्र. 5 च्या (ऑपरेशन ब्रेक दी चेन) एक्‍स्टेंशनमध्ये अडकला आहे, असेही नातू म्हणाले. 

सरकार नक्की आहे तरी कोणाचे? 
रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व आमदार सत्ताधारी घटक पक्षांचे आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांचा अध्यादेश चुकीचा आहे, असे जाहीरपणे सांगत आहेत. लॉकडाउन विरोधात निवेदने सादर केली जाताहेत. मग हे सरकार नक्की आहे तरी कोणाचे? असा सवाल त्यांनी केला. 
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA in charge of the district Dr Such a panchnama from grandchildren