महाविकास आघाडीबाबत आमदार दीपक केसरकर म्हणाले,

MLA Deepak Kesarkar Comments On Mahavikas Aghadi
MLA Deepak Kesarkar Comments On Mahavikas Aghadi

सावंतवाडी (सिंधुदुर्ग ) : राज्यात स्थापन झालेल्या महा विकास आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष कसे एकत्र येऊन काम करणार, याबाबत तिन्ही पक्षांच्या जिल्हाप्रमुखांना विनंती करणार आहोत. जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे सांगितले.

येथील नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा असून, विधानसभेत शहरवासीयांनी दिलेला कौल हाच निकाल मानून विरोधकांनीही निवडणूक बिनविरोध करण्याठी पुढे यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय 

श्री. केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राला संयमी, संवेदनशील व लोकांच्या मदतीला धावून जाणारा असा मुख्यमंत्री मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात शिवसेनेने दिलेली आश्‍वासने पाळण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

व्हीप डावलेल त्याचे सदस्यपद जाणार 

ते म्हणाले, 'बांदा, आंब्रड व आंबेगाव येथील पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीच बाजी मारणार आहे. लवकर जिल्हा परिषदेतही चांगली बातमी मिळणार असून, येथे महाविकास आघाडीची सत्ता बसणार आहे. पक्षांतर कायदा लक्षात घेता ज्या पक्षाच्या चिन्हातून निवडून आले आहे, त्या सदस्यांना पक्षाने काढलेला व्हीप पाळावा लागणार आहे. त्यामुळे कोणीही कितीही गट स्थापन केले तरी याठिकाणी चमत्कार होणार आहे ; मात्र व्हीप बजावूनही जो सदस्य व्हीप डावलेल त्याचे सदस्यपद जाणार आहे. आम्ही महविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा येथील पोटनिवडणूक लढविणार आहोत. चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन झाल्यास वेळ प्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ.'

ठाकरे मोदींना भेटणार

राज्य शासनाला दिलेला पैसा परत केंद्राकडे पाठविण्यात आला. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाते वेगळे आहे. ते लवकरच मोदी यांची भेट घेणार असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी केंद्र शासन देईल, याची खात्री आहे. महाराष्ट्र शासनाचा पैसा केंद्र शासनाला कसा जाणार नाही, याची काळजी सरकार घेणार असून केंद्राकडून कसा पैसा येईल यावर भर देण्यात येणार आहे. 'यावेळी शिवसेना प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परुळेकर , वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक बाबू कुडतरकर, उमा वारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 
 सावंतवाडीचा कायापालट करणार 

श्री. केसरकर म्हणाले, 'ज्या पद्धतीने मंत्री म्हणून जिल्ह्याने मला मागच्या पाच वर्षात साथ दिली ते पाहता यापुढेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिल्यास जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहे. सावंतवाडी शहराचाही कायापालट होण्याच्या दृष्टीने मी नेहमी कार्यरत राहणार आहे. एक आदर्श पालिका घडविण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.'
 
 विधानसभेचा कौल निकाल माना 

श्री. केसरकर म्हणाले, 'कोणी कितीही प्रयत्न केला तरी इथली सुसंस्कृत जनता सावंतवाडी शहर कोणाच्याही ताब्यात देणार नाही ; मात्र पुन्हा पुन्हा लोकांना निवडणुकीच्या प्रकियेमध्ये नेणे योग्य वाटत नसल्याने विधानसभेला जनतेने दिलेला कौल हा निकाल मानून सर्वांनी ही निवडणूक बिनविरोध पार पाडावी.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com