कोकणातील शिक्षक करतील तावडेंच्या धोरणाचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

चिपळूण - कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या अशैक्षणिक धोरणाविरोधात आहे. कोकणातील शिक्षक तावडेंच्या धोरणांचा पराभव करतील. शासकीय शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा घाट शिक्षणमंत्र्यांकडून घातला जात असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

चिपळूण - कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या अशैक्षणिक धोरणाविरोधात आहे. कोकणातील शिक्षक तावडेंच्या धोरणांचा पराभव करतील. शासकीय शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा घाट शिक्षणमंत्र्यांकडून घातला जात असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोकणात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीकडून अशोक बेलसरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिपळूण दौऱ्यावर आलेल्या आमदार कपिल पाटील, उमेदवार अशोक बेलसरे यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. आमदार पाटील म्हणाले की, ही निवडणूक शिक्षणमंत्री तावडेंच्या अशैक्षणिक धोरण विरोधातील आहे. राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवून टाकण्याचे शासनाचे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे परिणाम कोकणात अधिक जाणवणार आहेत. त्याविरोधात आपण विधान परिषदेत आवाज उठवला होता. शिक्षणमंत्र्यांनी हिंमत असेल तर कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून दाखवाव्यात. डोंगर कपारीतल्या शाळा बंद केल्यास सामान्य विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार नाही. कला-क्रीडा विषयाचे शिक्षक बंद केले आहेत. त्यासाठी अतिथी निदेशक संकल्पना आणली. त्याला जास्तीत जास्त अडीच हजार मानधन मिळणार आहे. या वेतनात ते काय शिकवणार. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत विषयासाठी एक, गणित व विज्ञानासाठी एकच शिक्षक नेमण्याचे शिक्षणमंत्र्यांचे नियोजन आहे. गणिताला इंग्रजी हा ऐच्छिक विषय ठेवण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणार नाही. सध्या केवळ शिक्षकांचा छळ करण्याचे काम सुरू आहे. शिक्षणमंत्री संस्था चालकांना चोर, दरोडेखोर म्हणू लागले आहेत. शिक्षकांचा असा अपमान कधी झाला नव्हता. शिक्षकांनी सेल्फी काढायचा की शिकवायचे, अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षणमंत्री केवळ जीआर काढण्यात गुंतले आहेत. काळानुरूप बदल हवा, मात्र विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असायला हवे. या सर्व वातावरणाला विरोध करण्यासाठी अशोक बेलसरे उभे आहेत.

यावेळी शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष हिराजी पाटील, धनाजी पाटील, प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे, जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, नीलेश कुंभार, रोहिदास भारदे, दिलीप मोरगे, विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Web Title: MLA kapil patil press conference