खासदार राऊत अनधिकृत मच्छिमारीचे दलाल - राणे

खासदार राऊत अनधिकृत मच्छिमारीचे दलाल - राणे

कणकवली - पारंपरिक मच्छीमार आमचे दैवत आहे असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे, जर ते दैवत असतील तर गरीब मच्छीमारांचे प्रश्न गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या सभागृहात का सुटले नाहीत. एलईडी फिसिंग का बंद झाली नाही, पर्ससीनच्या मंडळींना घेऊन दिल्लीदरबारी जाता याचा अर्थ तुम्ही ही अनधिकृत मच्छिमारीचे दलाल आहात, असा थेट आरोप आमदार नितेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केला आहे.

खासदार राऊत यांनी पारंपरिक मच्छीमारांना मध्ये दुही निर्माण करण्यात स्वाभिमान पक्ष पुढे आहे. त्यांना धडा शिकवला जाईल असा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी राणे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत बेछूट आरोप केले.

श्री. राणे म्हणाले,‘ संसदेच्या सभागृहात खासदार राऊत यांनी गेल्या पाच वर्षात जे प्रश्न विचारले होते. ती यादी  संकेतस्थळावरून आपण मिळवलेली आहे. मात्र एकही प्रश्न पारंपरिक मच्छीमारीबाबत विचारला नाही. संसदेमध्ये एलईडी आणि सीआरझेड बाबत आवाज उठवला नाही. राऊत हे चांगले भजनीबुवा आहेत, कीर्तनही करतात पण लोकांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी खासदार म्हणून तुम्हाला निवडून दिले होते. जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही तेथे आहात. आज मत्स्य दुष्काळ आहे. मच्छीमारांना आत्महत्या करण्याची वेळ आली. मात्र, राऊत यांनी गेल्याच महिन्यात पर्ससीन मच्छीमारांना घेऊन दिल्ली दरबार घाटला होता. मग पारंपारिकचे शिष्टमंडळ का भेटलं नाही. ते गरीब आहेत म्हणून, पर्ससीनधारक पैसेवाले असून त्यांचे खिसे भरतात हे या भेटीतून सिद्ध झाले. परराज्यातील पर्ससीन मासेमारी अनधिकृत आहे. त्यांना राऊत थेटपणे मदत करतात. कारण, निवडणुकीत पैसा मिळतो असा ही गंभीर आरोपही राणेंनी केला आहे.

किनारपट्टीत मोठा जनसमुदाय आहे. सीआरझेड मुळे या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागले आहे. गेल्या पाच वर्षात हा मुद्दा सोडलेला नाही. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. मालवणातील महसूल खाते तारकर्ली आणि देवबाग मधील लोकांना नोटीस पाठवून छळत आहे ज्या लोकांनी शिवसेनेला समर्थन केले होते त्याचे हे फळ आहे. मात्र यापुढे महसूल खात्याकडून नोटीस आली तर लोकांनी ती फाडून टाकावी. सीआरझेडमध्ये आम्ही तुम्हाला उध्वस्त होऊ देणार नाही, वेळ पडली तर कायदा हातात घेऊ यापूर्वीही मच्छीमारांच्या रक्षणासाठी मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांवर आम्ही बांगडा ही मारला होता. यावेळी पारंपरिक मच्छीमार आपल्या सोबत होते. काही लोकांना अटक झाली, गुन्हे दाखल झाले पण पाच वर्षात शिवसेनेच्या मंडळींनी एक तरी संघर्ष केला काय असा थेट सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुळात पालकमंत्री हे गृहराज्यमंत्री असून पारंपरिक मच्छीमारांना ते संरक्षण देऊ शकले नाहीत.,ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेच्या राजवटीतच मच्छीमारांची सर्वाधिक आंदोलने झाली आहेत. आता दैवत मानतात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले.

- नीतेश राणे, आमदार

येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानात हे मच्छीमार आपली ताकद दाखवून देतील. खासदार राऊत यांनी सरकारच्या बीएसएनएल मोबाईल टॉवरची अनेक भूमिपूजन केली. मात्र एकही टॉवर चालू झालेल्या नाही. ज्या गावात टॉवरची रेंज येईल तेथे आम्ही त्यांचा सत्कार करू, आता टॉवरची जबाबदारी ते अधिकार्‍यांवर झटकून देत आहे अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

आम्ही 24 तासात एलईडी बंद करू
आम्ही संघर्ष केला तर आमच्यावर केस दाखल केली जाते. पण आता अशा केसेस किती दाखल झाल्या तरी पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. एक दिवस पोलीस संरक्षण काढून टाकावे आम्ही 24 तासात एलईडी फिशिंग बंद करू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com