Loksabha 2019 : ही लढाई कोकण विरुद्ध शिवसेना

Loksabha 2019 :  ही लढाई कोकण विरुद्ध शिवसेना

रत्नागिरी - ही लढाई राणे विरुद्ध शिवसेना नाही, तर कोकण विरुद्ध शिवसेना अशी आहे. शिवसेनेच्या रुपाने कोकणाला लागलेला शाप निलेश राणेंच्या विजयाने पुसून जाणार आहे, असा विश्‍वास स्वाभिमानचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सध्या शिवसेनेला उठता बसता राणेच दिसत आहेत. त्यामुळे ते विरोधक नाही म्हणत राणेंवरच टिका करित फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणेंचा उमेदवारी अर्ज आज भरला. त्यावेळी खासदार नारायण राणे, शाम सावंत, दत्ता सामंत, राजन देसाई, रविंद्र नागरेकर, सतिश सावंत, मंगेश शिंदे उपस्थित होते. नीलेश यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या शक्तिप्रदर्शनाची रॅली काढण्याऐवजी मेळाव्याने शिवसेनेला चोख उत्तर दिले. 

अर्ज भरल्यानंतर महाजन क्रीडांगणावर स्वाभिमानचा मेळावा झाला. त्यात नीतेश म्हणाले की, विरोधकांनी 29 ला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळची चार पक्षांची एकत्र आलेली गर्दी आणि स्वाभिमानची आजची फक्त एका पक्षाची गर्दी पहा, म्हणजे निलेश यांच्या मागे किती जनसमुदाय आहे ते लक्षात येईल. ही कोकणच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. गेल्या पाच वर्षात एकही प्रश्न सुटलेला नाही. गृहखाते असुनही शिवसेनेला एलईडी मच्छीमारी बंदी करता आली नाही. हजारो पारंपरिक मच्छीमार देशोधडीला लागले. योग्य लोकप्रतिनिधी काय करू शकतो हे राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले.

विनायक राऊत यांना स्वतःचा आत्मविश्वास राहिला नाही म्हणून ते देवभूमीची सेवा करण्यासाठी पुन्हा पाच वर्षे मागत आहेत. हेच खासदार भजने म्हणत फिरत आहेत. त्यांना खासदार म्हणून भजन करायला संसदेत पाठवले नाही. त्या उलट मागील निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला तरीही निलेश राणेंनी रत्नागिरी सोडली नाही. ते येथील लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत आले आहेत. आजही राणेंच्या नावाने अधिकारी घाबरतात. कुणा महिलेला त्रास होत असेल तर त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी राणेंचे नाव घेतले जाते. नाणारच्या निमित्ताने कोकणची देवभूमी भस्मसात करायला शिवसेना निघाली होती. पण त्यांना स्वाभिमानने वेळीच आवर घातला. भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेची पूर्वीची भाषणे ऐकावीत ते यांच्या बाजूला देखील उभे राहणार नाहीत, असे सल्ला त्यांनी दिला.

याप्रसंगी निलेश राणे म्हणाले, 2014 ला माझा मोदी लाटेत पराभव झाला. तो विनायक राऊतचा विजय नव्हे तर तो मोदींचा विजय होता. पाच वर्षात त्यांनी काय केलं, तर फक्त भांडणच. रत्नागिरीला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मी अर्धी निवडणूक जिंकलो, अर्धी निवडणूक उरलेल्या दिवसात जिंकायची आहे. आम्ही जसं परदेशात, मुंबईत काही ठिकाणी बघतो तसं मला इथे करायचंय. मी कोणाच्या वैयक्तिक अंगावर गेलो नाही. मात्र, माझ्यावर अंगावर आले त्यांना धडा शिकवला. त्याही परिस्थितीत रत्नागिरीकर माझ्या सोबत राहिले. आम्ही असेपर्यंत कोकणचे कोणीही वाकडे करू शकत नाही. राणे हीच शिवसेनेची अडचण आहे. 

मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका 

कोकणाला ओळख द्यायची असेल तर डांबर चोर, मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका. सभागृहात जाऊन वडापावचे प्रश्न मांडतात. नितेश राणे सभागृह गाजवतो तर उदय सामंत कधी दिसले का सभागृहात बोलताना. सभागृहात एकही प्रश्न नाही उपस्थित केला, असा आरोप नीलेश यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com