नीतेश राणेंची दबंगगिरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

कणकवली - कणकवली शहरातील चिखलमय रस्त्यांची पाहणी करताना संतापलेल्या आमदार नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हायवेचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलाच्या बादल्या ओतून अंघोळ घातली.

कणकवली - कणकवली शहरातील चिखलमय रस्त्यांची पाहणी करताना संतापलेल्या आमदार नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हायवेचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलाच्या बादल्या ओतून अंघोळ घातली. त्यानंतर गडनदी पूल ते प्रांत कार्यालयापर्यंत शेडेकरांना हायवे पाहणीसाठी आणले. तेथील चिखलातून चालावयास भाग पाडले. याखेरीज स्वाभिमानच्या महिला कार्यकर्त्यांनीही शेडेकर यांना थापटांचा प्रसाद दिला. यावेळी आमदार राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. 

आमदार राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान सुरू होते. अखेर पंधरा दिवसांत शहरातील महामार्ग दुतर्फा सेवा रस्ता तयार करा, उर्वरित मालमत्ताधारकांचा तातडीने मोबदला द्या तसेच उड्डाणपुलाच्या पिलरचे काम तातडीने बंद व्हायला हवे; अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आमदार राणे यांनी दिल्यानंतर महामार्गावरील आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनावेळी अभियंत्यांना घालण्यात आलेली चिखलाची अंघोळ आणि महिला कार्यकर्त्यांनी दिलेला प्रसाद याच्या व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने राज्यभरात आंदोलन चर्चेचा विषय ठरले. 

कणकवली शहरातील महामार्ग दुरवस्थेबाबत आमदार राणे यांच्यावर शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार आरोप केले होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार राणे कार्यकर्त्यांसह सकाळी दहा वाजता थेट महामार्गावरच उतरले. शहरातील पटवर्धन चौक येथून त्यांनी हायवेची पाहणी सुरू केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह इतर नगरसेवकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणच्या समस्या राणेंच्या कानावर घातल्या. दुपारी अकराच्या सुमारास राणे कार्यकर्त्यांसह गडनदी पुलावर पोचले. यावेळी हायवे ठेकेदाराने खासगी जमिनीत केलेल्या अतिक्रमणाबाबतची चर्चा सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर तेथे आले. 

त्यावेळी राणेंचा संताप उफाळला. "तुम्हाला फक्त पिलर बांधण्याची घाई आहे. गटारे कोण बांधणार? सेवा रस्ते कधी तयार होणार? उर्वरित मोबदला कधी मिळणार? खड्डे कधी बुजवणार? रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची अवस्था तुम्ही पाहिलीय का? अशा अनेकविध प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी शेडेकरांवर केली. ही चर्चा सुरू असतानाच स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी चिखलाने भरलेल्या बदल्या शेडेकर यांच्या अंगावर ओतल्या. त्यानंतर त्यांना गडनदी पुलावर बांधून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. 

दुपारी साडेअकराच्या सुमारास आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांसह शेडेकर यांना घेऊन प्रांत कार्यालयापर्यंत पाहणी दौरा केला. प्रांत कार्यालयालगतच्या तुंबलेल्या नाल्यावरून पुन्हा एकदा शेडेकरांची हजेरी घेण्यात आली. याखेरीज तेथे साचलेल्या डबक्‍यातून त्यांना चालायलाही लावले. यानंतर हायवे अधिकाऱ्यांकडून फक्त स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल होत असल्याची तक्रार नगराध्यक्ष नलावडे यांनी केली आणि राणे पुन्हा संतापले.

"आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरलोय. तुम्ही आमच्यावर काय त्या केसेस टाका आम्ही जेलमध्ये जायला तयार आहेत' असे शेडेकरांना सुनावले. यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी शेडेकरांना थापटांचाही प्रसाद दिला. नगराध्यक्ष नलावडे यांनी मध्यस्ती करून हा प्रकार थांबवला. 

यानंतर प्रांत कार्यालयाबाहेर आमदार राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही जनतेसाठी भांडतोय. रस्ते सुस्थितीत असावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. त्यासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल. पोलिस केसेसही घेण्याचीही आमची तयारी आहे. यापुढे रस्ता सुधारणा झाली नाही तर हायवे अधिकारी आणि ठेकेदारालाच खड्ड्यात घालू पण जनतेला त्रास होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

प्रांत कार्यालयासमोर अभियंता शेडेकर यांना धक्‍काबुक्‍की झाल्यानंतर कॉन्स्टेबल बावधने यांनी त्यांना बाजूला केले. कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी शेडेकर यांना पोलिस ठाण्यात आणले; मात्र त्यांनी कोणाविरोधातही तक्रार न करता थेट सावंतवाडी कार्यालयाच्या दिशेने प्रयाण केले. 
महामार्गाच्या दूरवस्थेप्रश्‍नी आमदार राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला कणकवलीकरांनीही पाठिंबा दिला. राणेंच्या महामार्ग पाहणी दरम्यान शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या.

हायवे अधिकाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. आजच्या आंदोलनात नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर यांच्यासह नगरसेविका मेघा गांगण, उर्मी जाधव, अभिजित मुसळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राकेश राणे, पंचायत समिती सदस्य संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, राकेश राणे, संदीप नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

""कणकवलीतील खड्ड्यांची समस्या खूप झाली. ठेकेदाराकडून गाड्या घ्यायच्या आणि आंदोलनाची नौटंकी करायची हे आमचे कार्यक्रम नाहीत. जनतेची ठोस काम करायची हीच आमची कार्यपद्धती आहे. त्यासाठी आता मी छडी घेऊनच रस्त्यावर उतरणार आहे. दररोज सकाळी सात वाजता हायवेचे काम किती प्रगतिपथावर आहे, याचा आढावा घेणार आहे. येत्या 15 दिवसांत महामार्ग सुस्थितीत तयार करून देण्याची जबाबदारी मी घेतलीय आणि ती पूर्ण करूनच दाखवणार आहे. हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार कसे ऐकत नाहीत तेच मला बघायचे आहे.'' 
- नीतेश राणे,
आमदार 

काय घडले? 

  • नीतेश राणेंची सकाळी दहापासून हायवे पाहणी 
  • अकरा वाजता गडनदी पुलावर उपअभियंता शेडेकर यांच्याशी चर्चा 
  • राणेंशी चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांनी ओतल्या बादल्या 
  • शेडेकरांना गडनदी पुलालाही बांधण्याचा झाला प्रयत्न 
  • प्रांत कार्यालयासमोरील डबक्‍यातून उपअभियंत्यांना चालायला भाग पाडले 
  • प्रांत कार्यालयाबाहेर उपअभियंत्यांना चापटांचा प्रसाद  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane Dabhangiri in Sindhudurg