भाजपचे उपद्रवमूल्य मोठे

भाजपचे उपद्रवमूल्य मोठे

देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी  जामसंडे येथे पत्रकारांना सांगितले.

मतदारसंघात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाजपची मते आहेत. त्यामुळे आशीर्वाद देण्याएवढे आम्ही मोठे नसलो तरी आमचे उपद्रवमूल्य लक्षात घेण्यासारखे असल्याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली. 

तालुका दौऱ्यावर आलेले श्री. जठार जामसंडे येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवानेते संदेश पारकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे, स्नेहलता देशपांडे, नगरसेविका हर्षा ठाकूर, प्राजक्‍ता घाडी, राजेंद्र वालकर, सुभाष धुरी उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीबाबतचे आपले म्हणणे वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहोत. कार्यकर्त्यांची घुसमट त्यांच्या लक्षात आणून देणार, त्याबाबतची बाजू मांडणार तसेच कार्यकर्त्यांच्या तुंबलेल्या भावना त्यांच्यासमोर ठेवल्या जातील, मात्र मुख्यमंत्री देतील तो निर्णय पाळला जाईल. भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत असल्याने वरिष्ठांचा निर्णय मानतात.’’ 

ते म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय दौरे करण्यात आले. कणकवलीप्रमाणेच सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले मतदारसंघात राजन तेली तर कुडाळ-मालवणमध्ये अतुल काळसेकर दौरे करीत आहेत. उद्यापासून (ता.१७) जिल्हा परिषद गटप्रमुख बूथनिहाय दौरे करतील. होळीपूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्गात वाहनफेरी काढून संपर्क अभियान राबवले जाईल.’’ 

संदेश पारकरना शिवसेनेनेच पाडले
शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी आजवर भाजपच्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम करीत युतीचा धर्म पाळला. उलट भाजपचा उमेदवार पाडण्याचे काम शिवसेनेने केले. कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाने हात मिळवणी करून संदेश पारकर यांना पाडले. त्यामुळे अशी अनेक उदाहरणे आपण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याचे जठार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com