'शेतकऱ्यांच्याबाबतीत राजकारण केलं तर भाजप रस्त्यावर उतरेल'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

चिंचखरी येथे गटशेतीच्या प्रयोगाला मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई जिल्हा बॅंकेकडून ५० लाखांचा निधी देणार

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्‍न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती; मात्र जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेत स्थानिक मंत्र्यांनी घाणेरडे राजकारण केले, असा आरोप करत चिंचखरी येथे गटशेतीच्या प्रयोगाला मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई जिल्हा बॅंकेकडून ५० लाखांचा निधी देणार असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

चिंचखरी येथील गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आमदार लाड म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार बैठकीचे नियोजन होते; मात्र जिल्ह्यात स्थानिक मंत्र्यांकडून राजकारण सुरू आहे. बैठक यशस्वी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईतील बैठकीसाठी बोलावले. प्रशासनाचा आडमुठेपणा यातून दिसला. या वेळी नीलेश राणे, प्रमोद जठार यांनी हक्‍कभंग दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिले.’’ 

हेही वाचा -  महाराष्ट्र पडला मागे ; ४ राज्यांनी मारली बाजी -

या वेळी रवींद्र चव्हाण, नीलेश राणे, ॲड. दीपक पटवर्धन, विनय नातू, प्रमोद जठार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचखरीतील १२५ एकर जमिनीवर ७६ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली; मात्र त्यांना अर्थसाह्य मिळाले नव्हते. गटशेती योजनेतून प्रत्येकी २० चे गट करून फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करावी. त्याद्वारे लाभ दिला जावा, असे बैठकीत मांडले. त्याला जिल्हाधिकाऱ्यानी मान्यता दिली. यावर १५ दिवसात कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

चिंचखरी मॉडेल बनविण्यासाठी मुंबई सहकारी बॅंकेकडून ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या निधीतून शेतीसाठी अवजारे, खते, बियाणे यासह आवश्‍यक कामे करता येतील. जिल्ह्यात गटशेतीला चालना देण्यासाठी विधानसभेचे पाच आमदार, राज्यसभेचे खासदार नारायण राणे, विनय सहस्रबुद्धे हे पाच कोटीचा निधी देणार आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करताना कुणी राजकारण केलं तर राणे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा लाड यांनी दिला.

हेही वाचा -  आता शेतकऱ्यांची वसुली थांबवणार - ​

नारळ फोडण्याशिवाय काहीच करत नाहीत

पोमेंडी येथे खारलॅंडसाठी १ कोटी २० लाख रुपये रवींद्र वायकर पालकमंत्री असताना मंजूर झाले; परंतु स्थानिक मंत्री, पालकमंत्री नारळ फोडण्याशिवाय काहीच करत नाहीत. ते काम सुरू होण्याबाबत १५ दिवसात निर्णय घ्या, असे जिल्हाधिकाऱ्यांना बजावले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA prasad lad said in do not politics with farmers in ratnagiri