रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग मांडणार - साळवी

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग मांडणार - साळवी

राजापूर - राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तालुक्‍यातील प्रस्तावित जेटी प्रकल्पासंबंधी आजची पर्यावरणीय जनसुनावणी रद्द करण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने आज जनसुनावणी घेतली. त्यामुळे पर्यावरणमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखविल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

तालुक्‍यातील आंबोळगड सागरी किनारी आयलॉग पोर्ट कंपनीद्वारे जेटी प्रकल्पाबाबत आज जनसुनावणी झाली. जनसुनावणीसह प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. त्यामुळे जनसुनावणी रद्द करावी, अशी सूचना पर्यावरणमंत्री कदम यांनी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला केली होती. मात्र, तरीही सुनावणी झाली. त्याचे पडसाद शिवसेनेच्या वर्तुळात उमटले.

सरकारची कोकणावर वक्रदृष्टी असून, त्यातून पर्यावरणाला हानिकारक विविध प्रकल्प कोकणावर लादले जात आहेत. त्यातून निसर्गसंपन्न कोकण उद्‌ध्वस्त करण्याचा डाव आहे. जनसुनावणीवेळी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला विरोध कायम राहणार.
- हुस्नबानू खलिफे, 

आमदार, विधान परिषद 

पर्यावरणमंत्र्यांच्या सूचनेला न जुमानण्याच्या जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत आमदार साळवी यांनी तीव्र नापसंती करीत त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडणार असल्याचे स्पष्ट केले. 

लोकांच्या विरोधानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी रेटली. नागरिकांचा प्रकल्पाला विरोध नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, परिस्थिती उलट आहे. लोकांच्या विरोधानंतरही पूर्ण झालेली जनसुनावणी कागदावर पूर्ण झाली. जनरेट्याला आपला पाठिंबा असून, प्रकल्प रद्द झाला पाहिजे.
- अजित यशवंतराव, 

प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस 

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सूचनेला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. शिवसेना सत्तेत राहून लोकांची दिशाभूल करीत आहे. या प्रकल्पात स्वाभिमान पक्ष लोकांबरोबर राहून न्याय मिळवून देणार.
- हनिफ काझी, 

तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com