दळवी म्हणतात आदित्य ठाकरेंनी दापोलीतून लढावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

दाभोळ - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २०१९ निवडणुकीत आपल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी दापोलीतील शिवसेनेचे माजी 
आमदार सूर्यकांत दळवी यांनी केली आहे. ही त्यांची गुगली मानली जाते. 

दाभोळ - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २०१९ निवडणुकीत आपल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी दापोलीतील शिवसेनेचे माजी 
आमदार सूर्यकांत दळवी यांनी केली आहे. ही त्यांची गुगली मानली जाते. 

वरळी, शिवडी आदी मुंबईतील शिवसेनेचे आमदारांनी आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली असतानाच कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील असंख्य युवा सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या आदित्यजींची दूरदृष्टी नेतृत्वाने महाराष्ट्राला अत्यंत तरुण अभ्यासू मुख्यमंत्री मिळण्याच्या आशा प्रफुल्लीत झाल्या असून शिवसैनिकांच्या जोरावर असंख्य युवकांचे हे स्वप्न साकार होऊ शकते. उद्‌धव ठाकरे यांनी संधी दिल्यास आदित्यजींना बिनविरोध निवडून आणून कोकणवासीयांचा सन्मान वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांना दापोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्‌यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

योगेश कदम जिवाचे रान करणार
या संदर्भात युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रबळ दावेदार योगेश कदम यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास आम्ही त्यांना जिवाचे रान करून निवडून आणू व मुख्यमंत्री करू.

एका बाणात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न
सूर्यकांत दळवी यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावी, अशी मागणी करून एका बाणात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आदित्य दापोलीत निवडणूक लढविण्यास येणार नाहीत, हे त्‍यांना‍ही माहिती आहे. तरीही ते असे करतात. मात्र, काही दिवसांनंतर या प्रयोगामधील हवा आपोआप निघून जाते.

दापोली विधानसभा मतदारसंघात २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच टर्म आमदारकी भोगलेल्या दळवी यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी पराभव केला. त्यानंतर काही काळ दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला आलेली मरगळ लक्षात आल्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना घेऊन दापोली विधानसभा मतदारसंघात ‘एंट्री’ घेतली.

त्यानंतर सुमारे ४ वर्षे योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या सहकार्याने दापोली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. त्यामुळे योगेश कदम शिवसेनेत आपोआप ‘सेट’ झाले व दळवी यांचे राज्य आपोआप खालसा झाले. तेव्हापासून दळवी कदम यांचेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दळवींच्या मागणीमुळे योगेश कदम यांचा ‘पत्ता’ आपोआप कट होईल व आपला एक प्रतिस्पर्धी आपोआप बाद होईल, अशी व्यूहरचना करण्याचा सूर्यकांत दळवी यांनी प्रयत्न आहे. पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते असे नथीतून तीर मारण्याचे प्रयोग करतात.

मोजकीच मंडळी दळवींसोबत
 योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या सहकार्याने दापोली विधानसभा मतदारसंघात कोटयवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिकांचा ओढा योगेश कदमांकडे वाढलेला असून सूर्यकांत दळवी यांच्याकडे असणारे बहुसंख्य शिवसैनिक व पदाधिकारी योगेश कदम यांचेकडे गेले असून मोजकीच मंडळी दळवींकडे उरली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Suryakant Dalvi comment