आमदार उदय सामंत यांच्या जीवाला धोका

राजेश शेळके
बुधवार, 19 डिसेंबर 2018

रत्नागिरी - आमदार उदय सामंत यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. तसेच या संदर्भात उद्या ते पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

रत्नागिरी - म्हाडा अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. तसेच या संदर्भात उद्या ते पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

म्हाडाचा कार्यभार स्वीकारताच आमदार उदय सामंत यांनी जनहितासाठी उचलेल्या कठोर पावलांमुळे काही समाजकंटकांचे आणि विकासकांचे धाबे दणाणले आहेत. वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना भेटी देऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. आमदार सामंत यांनी जनसामान्यांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकासकांवर कारवाईची बडगा उगारला आहे. म्हाडा भोवती असणाऱ्या दलालांचा विळखा सोडवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकजण नाराज होऊ लागले असून यातूनच आमदार सामंत यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या आहेत. यापूर्वी ही बाब सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना देखील कळवली होती, मात्र अद्यापपर्यंत सुरक्षा पुरवण्यात आली नाही. या आलेल्या धमक्यांबाबत म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र दिले असून जीवाचे बरे वाईट काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे कळविले आहे. याचसंदर्भात आमदार सामंत उद्या पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

Web Title: MLA Uday Samant on hit list