वैभव नाईक : तत्काळ होम क्वारंटाइन व्हा ,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा....

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 22 July 2020

जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा हादरली.

ओरोस (सिंधुदुर्ग) : आमदार वैभव नाईक कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा हादरली. कारण पालकमंत्री उदय सामंत यांच्या १५ व १७ जुलैला झालेल्या शासकीय दौऱ्यातील बैठकांना आमदार नाईक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. परिणामी जिल्हा प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पालकमंत्र्यांना कोरोना नमुना चाचणी आणि क्‍वारंटाईन करून घेण्याची वेळ आली आहे.

आमदार नाईक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते काल जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांचे स्वॅब तपासणीस घेतले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले. तातडीने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला. यात प्रशासनातील बड्या अधिकारी आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असण्याच्या शक्‍यतेने प्रशासन हादरले आहे. पालकमंत्री उदय सामंत १५ जुलैला जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सकाळच्या सत्रात कणकवली येथे दौरा केला. सायंकाळी गणेशोत्सव नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा 
नियोजनच्या नवीन सभागृहात बैठक घेतली होती.

हेही वाचा- धरणे झाली; कालव्यांचे काय? कुठल्या जिल्ह्याचा आहे हा प्रश्न? -

या बैठकीला आमदार नाईक हजर होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह जिल्ह्याची बहुसंख्य प्रशासकीय यंत्रणाही उपस्थित होती. परिणामी श्री. सामंत यांच्यासह अन्य उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर क्‍वारंटाईनची टांगती तलवार आली आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत जिल्हा राज्यात द्वितीय असल्याची गोड बातमी काल सायंकाळी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोचते न पोचते तोपर्यंत दुसरी धक्कादायक बातमी येऊन धडकली. आमदार नाईक कोरोना बाधित झाल्याची बातमी नागरिकांत पोहोचताच खळबळ माजली. आमदार नाईक हे कोरोना बाधित असल्याचे काल रात्री उशिरा स्पष्ट झाले. त्यामुळे १५ जुलैपासून आमदार नाईक यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू झाला. 

हेही वाचा- प्रेरणादायी! संकटातही शोधलाय जगण्याचा `असा` मार्ग -

आमदार नाईक यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावर होता. विशेषत: कुडाळ आणि मालवण तालुक्‍यात ते शहरापासून गावोगावी फिरत होते. १५ व १७ ला पालकमंत्री सामंत यांच्या दौऱ्यातही ते होते. १७ रोजी ते कुडाळ शिवसेना शाखा, कुडाळ पंचायत समिती येथील कार्यक्रमाला ते उपस्थित होते. १५ ते १९ जुलैला आमदार नाईक यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली होती. यानिमित्त त्यांचा अनेक नागरिक-अधिकाऱ्यांशी संपर्क आला आहे. आता या संपर्क झालेल्या व्यक्ती शोधून काढण्याचे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर उभे आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्या व्यक्तीची संख्या अधिक असण्याच्या शक्‍यतेमुळे यातील हाय रिस्क आणि लो रिस्क व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.

हाय रिस्क, लो रिस्क तपासणार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी आमदार वैभव नाईक यांचा पूर्ण जिल्ह्यात दांडगा संपर्क आहे. १५ जुलैपासून ते जिल्ह्यात अनेक बैठका, दौऱ्यात सहभागी होते. त्यामुळे या काळात त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तींनी स्वतःहून नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा. यातील गरजेनुसार हाय रिस्क, लो रिस्क ठरविले जाईल, असे चाकुरकर म्हणाले.

जिल्हाधिकारी सेल्फ क्‍वारंटाईन
आमदार नाईक यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेल्या व्यक्तीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचाही समावेश होता. मंजुलक्ष्मी आज सकाळी कार्यालयात आल्या; मात्र थोड्या वेळाने त्या आपल्या निवासस्थानी परतल्या. खबरदारी म्हणून पुढील काही दिवस त्या सेल्फ क्‍वारंटाईन राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी आमदार नाईक यांचा नमुना घेतलेली स्वतःची केबिन बंद करीत दुसऱ्या दालनातून कारभार सुरू 
केला आहे.

हेही वाचा- शिवसैनिकांनो, काॅरंटाईन व्हा! असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष? - ​
तत्काळ होम क्वारंटाइन व्हा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आमदार नाईक यांचा संपर्क आलेल्या सर्वच व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्‍य नाही, तरीही त्यांचे नमुने घेणे आवश्‍यक आहे. यातील अतिजोखमीच्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येकाने तत्काळ क्‍वारंटाईन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हलगर्जीपणामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे काल कोरोना चाचणी केली. यात अहवाल पॉझिटिव्ह आला; पण तब्येत उत्तम आहे. येथील सर्व डॉक्‍टर काळजी घेत आहेत. औषधोपचार सुरू आहेत. तुमच्या आशीर्वादाने लवकरच बरा होईन. संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी रुग्णालयात दाखल व्हावे. संपर्कात आल्याने तुम्ही गुन्हेगार ठरणार नाही. माझ्या कुटुंबाची चाचणी करून घेतली आहे. सर्वांनी तत्काळ होम क्‍वारंटाईन व्हावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. 
- वैभव नाईक, आमदार

संपादन - अर्चना बनगे