मनसे स्वबळावर निवडणूक लढणार - राजन दाभोळकर

मनसे स्वबळावर निवडणूक लढणार - राजन दाभोळकर

कणकवली - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये समविचारी व्यक्तीबरोबर पक्षाचा हात देऊन मनसे या खेपेस स्वबळावर सर्व जागा लढवेल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर आणि धीरज परब यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली. तर सत्ताधाऱ्यांनी इमले बांधल्याने लोक त्यांनाही नाकारून आपल्याला स्वीकारतील, असेही स्पष्ट केले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिंधुदुर्गातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक येथील उपरकर यांच्या संपर्क कार्यालयात झाली. यानंतर माहिती देताना श्री. दाभोळकर म्हणाले, ‘‘मनसेने स्वबळावर लढण्याबाबच तयारी केली आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी झाली. एखाद्याने हातमिळवणी केली तर पक्षाचे सहकार्यही दिले जाईल. प्रसंगी सहविचारी पक्षाबरोबर युती करून लढण्याचीही तयारी आहे. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळे पाच गट आहेत तर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याने त्याचा फायदा आपल्याला होईल. सत्तेत राहून स्वार्थासाठी ज्यांनी इमले उभारले त्यांना जनता थारा देणार नाही. 

जिल्ह्यातील भाजपची प्रतिमा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यामुळे मलीन झाली आहे. त्यांनी नाधवडे येथे दूध डेअरी सुरू केली. आताही डेअरी एका खासगी कंपनीला विकून स्वतः व्यावसायिक झाले. शेतकरी मजुरदारांना दूध व्यवसायाचे स्वप्न दाखवून आज रस्त्यावर आणले. विजयदुर्ग किल्ल्यावर दुर्बीण बसविण्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये मंजूर झाले होते. हे काम सायन्स टेक्‍नॉलॉजी पार्क या कंपनीकडे देण्यात आले. ही कंपनी बनावट निघाल्यानंतर हे २५ लाख रुपये परत घेण्यात आले. यावरून श्री. जठार यांचा खोटेपणा स्पष्ट झाला. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पडू लागल्याने ते हवेत आहेत. याचाही फायदा आपल्याला होईल, असे श्री. दाभोळकर यांनी सांगितले.

सत्ताधारी भाजपच्या मंडळींना सत्तेची सूज झाली आहे. त्यामुळे पक्षामध्ये काही लोकांना प्रवेश देऊन प्रदर्शन मांडले आहे. पैशाचे आमिष दाखवून अनेकांना भाजप पक्षात घेतले जात आहे. 
- धीरज परब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com