वैद्यकीय अधीक्षकांना मनसेचा घेराओ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयात एक्‍स-रे मशीन बंदावस्थेत व रुग्णालयाच्या इतर गैरसोयींबाबत मनसेने रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना घेराओ घातला. आठ दिवसांत निधी उपलब्ध न केल्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानापासून भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या वेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, जनहित जिल्हा उपाध्यक्ष संदीप खानविलकर, शहराध्यक्ष सागर कांदळगावकर, प्रशांत मोरजकर, विनोद पोकळे आदी उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी निर्माण होत असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नवीन चालू करण्यात आलेल्या मशिनरी बंदावस्थेत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे बंदावस्थेत असलेल्या मशिनरी तत्काळ सुरू करून निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बंदावस्थेत आहे, एक्‍स-रे मशीन निधीअभावी नादुरुस्त आहे. यासाठी 2 लाख 70 हजार रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून शासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत हे जिल्ह्याचे सुपुत्र व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदासंघातील हे रुग्णालय असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत जनरेटर चालू करून एक्‍स-रे मशीन दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. तर हे आंदोलन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानापासून सुरू केले जाणार असून संपूर्ण शहरात आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.

Web Title: mns gherao to medical superintendent