गर्दीचे रूपांतर शक्‍तीत करण्याचा चिपळुणात आरंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

"सत्तेशिवाय किंवा सत्ताधाऱ्यांत धाक निर्माण करणारी राजकीय ताकद असल्याशिवाय मागण्या मान्य होत नाहीत. सध्याची शोषण देखील दूर होऊ शकणार नाही. त्यासाठीच आम्ही आमचा उमेदवार दिला आहे.''
- प्रकाश भोसले, चिपळूण

चिपळूण - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व प्रामुख्याने पालिका निवडणुकीत मराठा समाजाला डावलण्यात आल्यामुळे चिपळूण नगराध्यक्षपदासाठी आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. मराठा क्रांती मोर्चा हा मूक उद्रेक होता. आता या उद्रेकाचे दृश्‍य रूपांतर निवडणुकांतील सहभागात झाले आहे. हे पहिले पाऊल आहे. याची दखल राजकीय नेत्यांना घ्यावी लागणार आहे.

राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले. कुणाचीही मदत अथवा वरदहस्ताशिवाय हा समाज स्वबळावर रस्त्यावर येऊन आपला हक्क मागत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणजेच मराठा समाजाच्या मागण्या आहेत. हा समाज आजही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. मोर्चाला झालेल्या गर्दीचे शक्तीत रूपांतर केल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाही, हे वास्तव मराठा समाजाच्या लक्षात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. चिपळूण शहराच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या वर्गासाठी आहे, तेथे मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली होती; मात्र तेथेही अपेक्षाभंग झाला. बंडखोरी टाळण्यासाठी प्रमुख पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले नाहीत. निवडणुकीचे अर्ज भरताना उमेदवार कोण, हे सर्वांना समजले. आपल्याला डावलण्यात आल्याचे लक्षात येताच शीतल डांगे यांच्या रूपात स्वतंत्र उमेदवार मराठा समाजाने दिला. दोन तासांत उमेदवार तयार करून अर्ज भरण्यात आला. चिपळुणात मराठा समाजाची मते कमी असली तरी ती निर्णायक आहेत. शहरातील 26 प्रभागांत विखुरलेल्या मराठा समाजाला निवडणुकीच्या माध्यमातून जोडण्याचे काम होणार आहे.

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा?
मराठा सेवा संघाची शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने शनिवारी (ता. 29) राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी चिपळुणात सक्रिय होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Mob converts into Power in Chiplun