पैसा बोलला; पण चालणार का?

शिवप्रसाद देसाई ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी - नगरपालिकांसाठी झालेल्या लढतीत भरमसाठ पैसा चालला; पण तो बोलणार, की नाही हे मात्र उद्या (ता. 28) मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी - नगरपालिकांसाठी झालेल्या लढतीत भरमसाठ पैसा चालला; पण तो बोलणार, की नाही हे मात्र उद्या (ता. 28) मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या तीन पालिका आणि देवगड नगरपंचायतीसाठी आज मतदान झाले. या लढतींच्या प्रचाराची सांगता काल (ता. 26) दहानंतर झाली होती. त्यानंतर बहुसंख्य निवडणूक क्षेत्रात भरमसाठ पैसा चालला. काही भागांत तर रात्र जागून वाटप झाले. अगदी हजार रुपयाला एक मत असा दरही लागल्याची आज चर्चा होती. काहींनी जुन्या नोटा चालविल्या, तर काहींनी शंभर चालविले. मतदारांनीही सढळ हस्ते याचा स्वीकार केला. काही भागांत देवस्थाने, संस्था यासाठी मागणीच्या दुप्पट रोख पुरवठा झाला. हा पैसा मतदानाच्या रुपाने बोलला की नाही हे मात्र उद्या स्पष्ट होणार आहे.

गेल्या वेळी डिसेंबर 2011 मध्ये झालेल्या पालिकांसाठीच्या निवडणुका अशाच चुरशीच्या झाल्या होत्या. त्यावेळी देवगड वगळता इतर तीन पालिकांसाठी लढत होती. या निवडणुकीच्या रुपाने पहिल्यांदाच विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय युद्ध मतदानाच्या पातळीवर खेळले गेले होते. केसरकर त्यावेळी राष्ट्रवादीत होते. बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी छुपी युती होती. याला वेंगुर्लेत 5 डिसेंबर 2011 ला झालेल्या वेंगुर्लेतील राजकीय राड्याची झालर जोडली गेली. त्यामुळे धक्कादायक निकाल समोर आले. एकूण 51 जागांसाठी झालेल्या लढतीत राष्ट्रवादीने 35, कॉंग्रेसने 9, शिवसेना-भाजपने प्रत्येकी दोन तर मनसे आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. वेंगुर्ले आणि सावंतवाडीत राष्ट्रवादीची सत्ता, तर मालवणात त्रिशंकू स्थिती होती. सावंतवाडीत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला व्हाईट वॉश दिला होता. त्यावेळी केसरकर किंगमेकर ठरले होते. या निवडणुकीत पैसा, विकासाचा मुद्दा यापेक्षा भावनिक प्रचार हीट ठरला होता.

आज देवगडसह चारही पालिकांमध्ये 71 जागांसाठी मतदान झाले. उमेदवारांची भाऊगर्दी आणि तुलनेत छोटे झालेले प्रभाग यांमुळे चुरस वाढली आहे. सावंतवाडीत 80, वेंगुर्लेत 77, मालवणात 62, देवगडात 57 अशा मिळून 276 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. हा जनमताचा कौल कशाच्या प्रभावाखाली असणार याची उत्सुकता आहे. कारण प्रचारात विकासाच्या मुद्द्यांबरोबरच तुरुंगात पाठविण्याची भाषाही सगळ्याच बड्या नेत्यांनी वापरली. त्यातच सुजाण समजल्या जाणाऱ्या शहरी भागात सढळहस्ते पैसाही बोलला. ही सगळी स्थिती लक्षात घेता या लढतींचे निकाल राजकारणातील बदलत्या वाटेसाठी दिशादर्शक ठरण्याची शक्‍यता आहे.

तिरंगी लढती, पैशांचा खुलेआम वापर
लोकसभा आणि विधानसभेतील पराभवामुळे कॉंग्रेस पूर्वीइतकी भक्कम राहिलेली नाही. केसरकरांकडे पालकमंत्रिपद असले तरी मतदारांचे समाधान करण्यात ते तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. इतर पक्षांमधून दाखल झालेल्या नेत्यांमुळे आणि केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे भाजप अचानक मुख्य राजकीय प्रवाहात आला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने त्यांना भक्कम गॉडफादरही मिळाला आहे. या सगळ्या स्थितीमुळे बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. यातच पैशाचे वाटप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मतदार नेमका कशाला प्राधान्य देणार याची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: money in sawantwadi elections